Sakal Exclusive : रेशनकार्डचे डिजिटायझेशन; ऑनलाइन डाउनलोड करता येणार; लाभार्थ्यांना मिळणार आता ई-शिधापत्रिका | Sakal Exclusive Digitization of Ration Card Downloadable online Beneficiaries now get e ration card Nandurbar News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ration cards currently in use

Sakal Exclusive : रेशनकार्डचे डिजिटायझेशन; ऑनलाइन डाउनलोड करता येणार; लाभार्थ्यांना मिळणार आता ई-शिधापत्रिका

Nandurbar News : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज असणारी शिधापत्रिका लाभार्थ्यांना आता ऑनलाइन उपलब्ध होऊन डाउनलोड करता येणार आहे.

ही ऑनलाइन ई-शिधापत्रिका राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील व राज्य योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना निःशुल्क देण्यात येणार आहे.

त्यामुळे आतापावेतो शिधापत्रिकेवर असणारा केशरी, पिवळा रंग जाऊन शिधापत्रिका रंगहीन होणार आहेत. (Sakal Exclusive Digitization of Ration Card Downloadable online Beneficiaries now get e ration card Nandurbar News)

दुसरीकडे योजनानिहाय ऑनलाइन शिधापत्रिकेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. असे असले तरी लाभार्थ्यांना डाउनलोड करून प्रिंट काढण्याचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ई-शिधापत्रिका डाउनलोड करून प्रिंट काढण्याची डोकेदुखी लाभार्थ्यांची वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभार्थ्यांकरिता ई-शिधापत्रिका ऑनलाइन तसेच डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याअंतर्गत अंत्योदय अन्न शिधापत्रिका, प्राधान्य कुटुंब योजना व राज्य योजनेतील शिधापत्रिकांना शुल्क आकारून सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे व राज्य योजनेचे शिधापत्रिकाधारक गरीब व गरजू कुटुंबातील असल्याने या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सेवाशुल्क न आकारता ही सुविधा मोफत देण्याचा निर्णय १६ मेस घेण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या ई-शिधापत्रिकेवर अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब योजना अथवा राज्य योजनेतील कोणत्या योजनेंतर्गत देण्यात आली असे नमूद करण्यात येणार आहे.

त्यामुळे आतापावतो या योजनांसाठी वापरले जाणारे केशरी, पिवळा रंग बंद होऊन शिधापत्रिका रंगहीन होणार आहेत.

दुसरीकडे शिधापत्रिकादेखील ऑनलाइन उपलब्ध होऊन डाउनलोड करता येणार असल्याने गावोगावी असणाऱ्या ग्रामपंचायतीमधील संगणक केंद्रात व सेतू सुविधा केंद्रात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ऑनलाइन ई-शिधापत्रिका लाभार्थ्यांना rcms.mahafood.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शिधापत्रिकांची एकूण स्थिती

योजना एकूण कार्ड एकूण लाभार्थी

अंत्योदय (AAY) १,०१,५१९ ५,१४,३३१

प्राधान्य कुटुंब (PHH) १,७८,०१७ ७,३७,३७७

प्राधान्य नसलेले (NPH) ५२,५८९ १,८२,०७१

रेशन दुकाने : ऑनलाइन- १,०६४, ऑफलाइन ०२