नेमबाज तनयच्या मदतीसाठी सरसावले दानशूर

नेमबाज तनयच्या मदतीसाठी सरसावले दानशूर

धुळे - विद्यार्थी दशेतच नेमबाजीत देदीप्यमान कामगिरी करणारा येथील श्री एकवीरादेवी हायस्कूलचा विद्यार्थी तनय जोशीच्या मदतीसाठी दोंडाईचातील सेवाव्रती हस्ती परिवार, कोल्हापूर येथील प्रथितयश व्यावसायिक, पिंपळनेर, धुळे येथील दानशूर पुढे सरसावले आहेत. तनयला आज दिवसभरात २७ हजार शंभर रुपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली.  

‘सकाळ माध्यम समूहा’च्या माध्यमातून झालेल्या आवाहनानंतर बांधिलकीच्या कार्यात अग्रेसर दोंडाईचा येथील हस्ती परिवाराचे आधारस्तंभ आणि हस्ती पब्लिक स्कूल, हस्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष कैलास जैन यांनी २५ हजार, पिंपळनेर येथील आबा विसपुते यांनी एक हजार रुपये, धुळे शहरातील रवींद्र जोशी यांनी ११०० रुपयांची मदत दिली. कोल्हापूर येथील प्रथितयश व्यावसायिक विनय कुळकर्णी यांनी तनयशी संवाद साधत माहिती घेतली आणि यथाशक्ती मदत करण्याची ग्वाही दिली.

दोन लाखांची गरज
विविध स्पर्धांमध्ये नेमबाजीतून धुळ्याचा नावलौकिक उंचावणारा आणि सुवर्णपदकांचा मानकरी ठरलेल्या येथील तनयला पिस्तूल खरेदीसाठी दोन लाखांच्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्याची आर्थिक स्थितीत बेताची आहे. त्याला दानशूरांचे पाठबळ मिळाल्यास त्याची कामगिरी अधिक सरस होऊ शकेल. तो वयाच्या १२ व्या वर्षापासून म्हणजेच २०१३ पासून १० मीटर एअर पिस्टल या प्रकारात खेळत आहे. जिल्हा ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत त्याने भरारी घेत स्पृहणीय कामगिरीतून जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे. 

मदतीसाठी संपर्क
जिल्हास्तरावर झालेल्या पाच इंटरस्कूल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये सुवर्णपदक, विभागीय दोन स्पर्धांमध्ये रजत व कांस्यपदक, राज्यस्तरावरील विविध स्पर्धांमध्ये रजतपदक, राष्ट्रीय स्तरावर इंटरस्कूल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. शिवाय त्रिवेंद्रमसह विविध ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने पात्रता फेरी गाठली आहे. तसेच राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांसाठीही तो पात्र ठरला आहे. त्यामुळे सरावासाठी त्याला पिस्तूलची नितांत गरज आहे. मदतीसाठी तनयशी ९०११८ ९६५४४, तसेच ९८८१० ९०४६४ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com