वडनेरभैरवचे बापू साळुंके यांना राष्ट्रीय जल मिशन पुरस्कार जाहीर 

Residential Photo
Residential Photo

नाशिक ः जलशक्ती जल मिशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून, शेतकरी गटातून वडनेरभैरवचे बापू साळुंके यांनी देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. विविध गटांतून आंध्र प्रदेशने चार आणि तेलंगणाने तीन पुरस्कार मिळवत आघाडी घेतली. राजस्थान, महाराष्ट्राला प्रत्येकी दोन पुरस्कार मिळालेत. बुधवारी (ता. 25) दुपारी तीनला नवी दिल्लीतील विज्ञानभवनात केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. राज्यमंत्री रतन लाल, जलसंधारणचे सचिव यू. पी. सिंग उपस्थित राहतील. 
पाण्याचा अधिक कार्यक्षमरित्या सामूहिक आणि वैयक्तिक पातळीवर वापर करणाऱ्या संस्था, उद्योग, व्यक्ती व सरकारी संस्थांना "नॅशनल मिशन ऍवॉर्ड' पुरस्कार दिला जातो. पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय जल मिशनचे संचालक जी. अशोक कुमार यांनी केली. एकूण पाच गटांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. अनुक्रमे दोन लाख, दीड लाख आणि एक लाख असे पुरस्कारांचे स्वरूप असेल. वडनेर भैरव (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील बापू साळुंके यांची 25 एकर शेती आहे. पाण्यासाठी त्यांनी सहा विहिरी आणि तीन बोअर खोदले असून, दोन शेततळ्यांची निर्मिती केली. एक शेततळे दीड कोटी, तर दुसरे 75 लाख लिटर क्षमतेचे आहे. त्यासाठी त्यांनी तीन किलोमीटर अंतराची पाइपलाइन केली आहे. प्रवाही सिंचनाचा वापर टाळून पिकांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात येते. त्यामुळेच त्यांची दहा एकरांवरील द्राक्ष शेती 22 एकरांपर्यंत पोचली. 

गटनिहाय पुरस्कारविजेते 
सार्वजनिक क्षेत्रात पाणीविषयक माहितीचा विस्तार ः प्रथम- आंध्र प्रदेशचा जलसंधारण विभाग, द्वितीय- तेलंगणाचा जलसंपदा विभाग. हवामान बदलाचे जलस्रोतांवर होणारे परिणाम ः प्रथम- भोपाळचा पर्यावरण योजना व समन्वय विभाग, द्वितीय- आंध्र प्रदेशचा जलसंधारण विभाग. जलसंवर्धन, जलवृद्धी व जलसंधारण राज्यातील नागरिकांमध्ये जनजागृती ः प्रथम- राजस्थानचा जलसंधारण विभाग, द्वितीय- जलपोषण ट्रस्ट, तृतीय- पंजाबचा मृद व जलसंवर्धन विभाग व केरळची पंप परिक्षण समिती. असुरक्षित व शोषित भागात जल क्षेत्रात विशेष कामगिरी ः प्रथम- शिवगंगा समग्र ग्रामविकास परिषद, द्वितीय- राजस्थानचे अंबुजा सिमेंट फाउंडेशन, तृतीय- तेलंगणाचा भूजल विभाग. पाण्याच्या कार्यक्षमतेमध्ये वीस टक्के वाढ ः वैयक्तिक, शेतकरी आणि नागरिक ः प्रथम- बापू साळुंके, द्वितीय- तमिळनाडू कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. एस. सेंदूर कुमारन. पाणीवापर संस्था, बचतगट, नागरी रहिवासी सोसायटी ः प्रथम- उत्तर प्रदेशमधील परमार्थ समाजसेवा संस्थान. स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी विभाग ः प्रथम- तेलंगणाचा ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, द्वितीय- राजस्थानचा जलसंधारण विभाग, तृतीय- आंध्र प्रदेशचा फलोत्पादन विभाग. उद्योगसमूह- कॉर्पोरेट ः प्रथम ः गुंटूरची हिंदुस्थान कोका कोला, द्वितीय- ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी आणि युनायटेड ब्रेव्हरेजिस, तृतीय- रेमंड युको डेनिम कंपनी. नदीपात्राच्या क्षेत्रातील एकात्मिक जलव्यवस्थापन क्षेत्रात प्रचार ः प्रथम-आंध्र प्रदेशचा जलसंधारण विभाग, द्वितीय- महाराष्ट्राचा जलसंधारण विभाग. 

पिकांसाठी पाण्याची वापर कार्यक्षमता 20 टक्‍क्‍यांनी वाढविण्याबद्दल व शेतीसाठी अचूक पाणी व्यवस्थापन केल्याबद्दल हा बहुमान मिळाला. "सकाळ-ऍग्रोवन'ने एप्रिलमध्ये माझ्या कामाची दखल घेतली होती. त्यामुळे जलशक्ती मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. 
- बापू भाऊसाहेब साळुंके (वडनेरभैरव) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com