भाजपने सांगितले तरच सत्तेबाहेर पडू - संजय राऊत 

निखिल सूर्यवंशी (सरकारनामा ब्युरो)
सोमवार, 12 जून 2017

शेतकऱ्यांचे प्रश्न आंदोलनातून मांडणाऱ्या शिवसेनेची सत्तेत अडचण होत आहे, असे भाजपने सांगावे. तुम्ही (शिवसेना) सरकारमधून बाहेर पडा, आमचे काय ते आम्ही पाहून घेऊ, हेही त्यांनी स्पष्ट करावे. शिवसेना लागलीच सत्तेतून बाहेर पडेल. आम्हीच स्वतःहून कशाला बाहेर पडायला पाहिजे, अशी भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी 'सरकारनामा'शी बोलताना मांडली. 

धुळे - जनहित, शेतकऱ्यांचे प्रश्न आंदोलनातून मांडणाऱ्या शिवसेनेची सत्तेत अडचण होत आहे, असे भाजपने सांगावे. तुम्ही (शिवसेना) सरकारमधून बाहेर पडा, आमचे काय ते आम्ही पाहून घेऊ, हेही त्यांनी स्पष्ट करावे. शिवसेना लागलीच सत्तेतून बाहेर पडेल. आम्हीच स्वतःहून कशाला बाहेर पडायला पाहिजे, अशी भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी 'सरकारनामा'शी बोलताना मांडली. 
 
शिवसंपर्क अभियानासाठी खासदार राऊत दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरातील शाहू नाट्यमंदिरात सकाळी साडेअकराला पक्षाचा मेळावा झाला. त्यात पुढील मुख्यमंत्री हा शिवसेनेचा राहील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील, असे मी जाहीर करत असल्याचे खासदार राऊत म्हणाले. तसेच शिवसेना जुलैमध्ये राजकीय भूकंप केल्याशिवाय राहणार नाही. भूकंपाची भाषा केल्याबरोबर तडे मंत्रालय व वर्षा बंगल्यापर्यंत पोहोचल्यामुळे कर्जमुक्तीची घोषणा झाल्याचे ते म्हणाले. 

भाजपने सांगितले तरच सत्तेबाहेर 
मेळाव्यापूर्वी शिवआरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. माधुरी विपुल बाफना- बोरसे यांच्या निवासस्थानी खासदार राऊत यांनी निरनिराळ्या प्रश्नांवर 'सरकारनामा'शी दिलखुलास संवाद साधला. शिवसेना व भाजपमध्ये सख्य उरले नसल्याने राज्यात मध्यावधी निवडणूक केव्हाही लागू शकते. याअनुषंगाने शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, भाजप शिवसेनेची साथ सोडेल, अशी उलटसुलट चर्चाही होते. यात नेमके काय घडेल?, अशा प्रश्नावर खासदार राऊत म्हणाले, राज्यात केव्हा काहीही घडू शकते. काही तरी बऱ्यापैकी घडावे, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे. स्व-आमदारांचे संख्याबळ अधिक असल्याने भाजपने पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही. सरकारमध्ये राहूनही सरकारला विरोध करतात, जनहितासह शेतकऱ्यांचे प्रश्न आंदोलनातून मांडतात, विरोधी पक्षाचे काम करतात, मग सत्तेतून बाहेर का पडत नाहीत, अशी विचारणा शिवसेनेला होते. मुख्यमंत्रीपदामुळे भाजपच्या सरकारकडे शिवसेनेचे मंत्री वाढवा, शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांचे अधिकार वाढवा, गृहमंत्रिपद द्या, अशी मागणी शिवसेना कधीही करत नाही. तशी मागणी केलेली नाही. शेतकऱ्यांसह जनहिताच्या इतर महत्त्वाच्याप्रश्नांवर शिवसेना आंदोलन करते. याप्रश्नांची अडचण होत असल्याचे भाजपने सांगावे. तुम्ही शेतकऱ्यांच्याप्रश्नावर रान उठवल्याने आमची अडचण होतेय, सरकारमधून बाहेर पडा, आमचे आम्ही पाहून घेऊ, असे भाजपने स्पष्ट केल्यास सत्तेतून शिवसेना बाहेर पडेल. आम्हीच कशाला बाहेर पडायला पाहिजे. 
 
लाथा घातल्याने कर्जमुक्ती 
राज्यातील आगामी व पुढील सर्वच निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यात अस्तित्वच उरले नसल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई असेल. शिवसेनेने तीव्र आंदोलन, नाशिकच्या कृषी अधिवेशनातून दबाव निर्माण केल्याने भाजप सरकारने 'तत्त्वतः' कर्जमाफी जाहीर तर केली. त्यात तत्त्वतः या शासकीय शब्दाचा नेमका अर्थ आम्ही शोधत आहोत. सरसकट कर्जमाफी जुलैअखेरपर्यंत प्रत्यक्षात उतरली नाही, तर शिवसेना अधिक तीव्र आंदोलन सुरू करेल. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले, हमीभाव दिला, तर त्यांच्या आत्महत्या थांबविता येऊ शकतात. यासाठी सर्व काही झुगारून शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरली आहे. सरकारमध्ये राहून भाजप सरकारच्या कमरेत लाथा घालत राहिलो म्हणून कर्जमुक्ती झाली. शिवसेना सरकारमधून का बाहेर पडत नाही याप्रश्नावर कर्जमुक्ती हे उत्तर असल्याचे खासदार राऊत यांनी ठासून सांगितले.

Web Title: sakal news breaking news dhule news shivsena news bjp sanjay raut maharashtra