मविप्रचा हाॅर्टिकल्चर- पशुवैद्यकीय- आयुर्वेद- महिला- दिव्यांग- रात्र महाविद्यालयाचा मानस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नाशिक ः मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे भविष्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी जाहीर केले. तसेच हॉर्टिकल्चर, आयुर्वेद, पशुवैद्यकीय, महिला, दिव्यांग, रात्र महाविद्यालय सुरु करायचे असल्याचेही त्यांनी नमुद केले. 

नाशिक ः मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे भविष्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी जाहीर केले. तसेच हॉर्टिकल्चर, आयुर्वेद, पशुवैद्यकीय, महिला, दिव्यांग, रात्र महाविद्यालय सुरु करायचे असल्याचेही त्यांनी नमुद केले. 
संस्थेची 105 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. 8) रावसाहेब थोरत सभागृहात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे अध्यक्षस्थानी होते. सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. संस्थेला यापुढील काळात शंभर कोटींचे कर्ज घ्यावे लागेल, असे सांगून श्रीमती पवार म्हणाल्या, की वर्षभरात 14 एकर 13 आर जमीन खरेदी करण्यात आली आहे. खरेदी आणि साठेखत मिळून संस्थेच्या मालकीची जमीन एक हजार 8 एकराच्या पुढे पोचली. 2018-19 च्या 649 कोटी 40 लाखांच्या अंदाजपत्रकातील 607 कोटी 76 लाख खर्च झाले आहेत. त्यात विनाअनुदानितच्या सेवकांसाठीच्या 114 कोटी 12 लाखांचा समावेश आहे. संस्थेने 78 कोटी 36 लाखांची गुंतवणूक केली आहे. त्यात टीडीआरच्या 21 कोटी 50 लाखांचा समावेश आहे. 
तालुकास्तरावर सीबीएसई शाळा सुरु करणार 
संस्थेतर्फे सीबीएसई शाळा सुरु करण्यासाठी दोन ठिकाणच्या इमारतींचा विषय मार्गी लागल्यानंतर तालुकास्तरावर अशा शाळा सुरु केल्या जातील. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार विद्यार्थी संख्या कमी झाली. संस्थेच्या 485 शाखा असून, त्यामधून 2 लाख 12 हजार 543 विद्यार्थी शिक्षण घेताहेत. 9 हजार 374 सेवक वर्ग आहे. अनुदानित 218 आणि विनाअनुदानित 267 शाखा आहेत. प्राथमिक शाळांमधून डिजीटल क्‍लासरुम सुरु करण्यात आल्या आहेत. पहिलीपासून संस्कृत विषय शिकवण्यात येत आहे. 45 प्रकारचे उपक्रम राबवले जातात. 160 पैकी 153 माध्यमिक शाळांमधून 753 सेमी इंग्रजी वर्ग सुरु केलेत. वडनेर भैरवच्या इंग्रजी शाळेला सीबीएसईची मान्यता मिळाली. शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहे. बारावीनंतर गुणवत्तेत भर पडावी म्हणून स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर "पीक एक्‍झाम' घेण्यात येत आहे. डिलीजंट बॅच सुरु करण्यात आली. साहित्य निर्मितीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु झाली आहे. औषधनिर्माणशास्त्रचे शिक्षण घेतलेले पाचशे विद्यार्थी परदेशात स्थायिक झालेत. बॅचलर ऑफ डिझाईन अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र इमारत उभारावी लागेल. वैद्यकीय महाविद्यालयात सभासद आणि त्यांच्या पत्नीसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते. एम. आर. आय. चोवीस तास सुरु ठेवायचे आहे. शिवाय प्रत्येक शाळेत जनशिक्षण केंद्र सुरु केले जाणार आहे. कृषी तंत्रज्ञानसाठी स्वतंत्र इमारती आणि 50 एकर जागेची आवश्‍यकता आहे. कृषी महाविद्यालय चाचडगावमध्ये स्थलांतरीत करण्यात येत आहे. भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालयाचे लवकरच उद्‌घाटन होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 
ठळक नोंदी 
* विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे के. टी. एच. एम. महाविद्यालयाला "मेंटॉर' म्हणून 30 लाखांचे अनुदान मंजूर 
* सतत न्यायालयात आव्हान देणाऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल विधीज्ञांशी चर्चा करुन कारवाई होणार 
* जयराम पाटील यांनी निलीमाताई पवार यांना सरकारने "पद्म' पुरस्काराने सन्मानित करण्यासंबंधीचा मांडलेल्या ठरावाला अनुमोदन 
* ऍड्‌. संतोष गटकळ, प्राचार्य हरिष आडके, राजेंद्र पवार आदींनी केल्या सूचना 
* मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले समाजगीत 
* विषयाला धरुन आणि अध्यक्षांची परवानगी न घेऊन बोलणाऱ्या सभासदाला संतप्त सभासदांनी खाली बसवले 

शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता या तत्वावर संस्थेची वाटचाल सुरु आहे. त्यामध्ये सभासदांचे योगदान मोलाचे आहे. समाज नव्या वाटेने निघाल्याची प्रचिती सभांमधून येऊ लागली आहे. कार्यकारी मंडळाने निष्ठेने संस्थेचे कामकाज चालवले आहे.
- डॉ. तुषार शेवाळे (अध्यक्ष, मविप्र) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Education