सत्ता मिळताच नाशिकमध्ये आयटी पार्क आणू  ः सुप्रिया सुळे

Live Photo
Live Photo

नाशिक ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नाशिक कुपोषित झाले आहे. तसेच औद्योगिक मंदीमुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी टीका करत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता. 27) येथे राज्यात सत्ता मिळताच, नाशिकच्या विकासासाठी आयटी पार्क आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली. 
नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील भोळे मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. 27) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झालेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शेफाली भुजबळ, प्रेरणा बलकवडे, डॉ. योगिता हिरे, अनिता भामरे आदी उपस्थित होते. 
 

सगळीच रसायने नसतात चांगली 
भाजपचे नेते कामे न केल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आरोप करतात. मात्र मला प्रश्‍न मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे, तो म्हणजे, आमचा माणूस तुमच्याकडे आल्यावर स्वच्छ होतो का? तुमच्याकडे कोणती वॉशिंग पावडर आहे? मुख्यमंत्री म्हणताहेत, की आमच्याकडे डॅशिंग रसायन आहे. पण लक्षात ठेवावे, की सगळी रसायने चांगली असतात असे नाही. पक्षांतर करणाऱ्यांनी तुमच्यावर कोणते तरी घातक रसायन टाकले नाही ना ते आधी बघा, असा उपरोधिक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. 
डॉ. हिरे म्हणाले, की नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात दोन औद्योगिक वसाहती असून, इथल्या नामांकित कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या पाच वर्षांत एकही नवीन कारखाना सुरू झाला नाही. सिडको-सातपूरकरांसाठी सुसज्ज रुग्णालय नाही. 2024 मध्ये डिझेल गाड्यांऐवजी इलेक्‍ट्रिक गाड्या बनविण्याचा निर्णय आणल्यानंतर मोठे प्रकल्प बंद होऊन नाशिककरांवर उपासमारीची वेळ येणार. आम्ही घेतलेल्या रोजगार मेळाव्यात पाच हजार 800 विद्यार्थ्यांच्या मुलाखती दिल्या. त्यातील एक हजार 860 विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला. पण त्यातील काही तरुणांना नाशिकमध्ये रोजगार मिळाला. उर्वरितांना शहराबाहेर जावे लागले, असे डॉ. हिरे यांनी सांगितले. संतोष गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. जीवन रायते यांनी आभार मानले. 

गरिबी वाढत चालली आहे. अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. शिक्षणाची वाईट स्थिती झाली आहे. या प्रश्‍नांवर चर्चा होऊन त्यांची सोडवणूक करण्याची भूमिका मांडायला हवी. पण त्याऐवजी रोजच्या जगण्याशी संबंधित नसलेल्या विषयांकडे लक्ष वेधले जात आहे. 
-सुप्रिया सुळे, खासदार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com