संत गाडगे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिंगवे 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

नाशिक ः मंदिरांचे गाव म्हणून परिचित असलेल्या पाच हजार लोकवस्तीच्या शिंगवे गावाला रामायणकालीन आख्यायिकेचे कोंदण मिळाले आहे. संत गाडगे महाराजांचा पदस्पर्श गावाला झाला असून, त्यांच्या सूचनेनुसार सिद्धेश्‍वर मंदिराला दगडी कोट बांधण्यात आला. जागतिक अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे बालपण याच गावातील. तीनमजली लाकडी बांधकाम असलेल्या हनुमान मंदिरात पन्नास ते साठ वर्षांपूर्वीच्या चित्रांचा खजिना भिंतीवर पाहायला मिळतो. 

गावातील पहिलवान अहिल्याजी यांच्या नावाने बांधण्यात आलेले मंदिरदेखील गावाचा इतिहास समोर ठेवते. शंकरपुरी महाराजांचे संजीवन समाधी मंदिर गावात आहे. पंचक्रोशीतील कालिका मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. खंडेराव, ग्रामदेवता मरीमाता, कानिफनाथ मंदिराच्या जोडीला बुद्धविहार हे गावाचे वैभव आहे. दत्त जयंतीला खंडेराव महाराज यात्रा भरते. त्या वेळी परंपरेनुसार शंभर वर्षांपासून बारागाड्या ओढण्याची परंपरा आजही कायम आहे. तसेच सद्‌गुरू शंकर महाराज सप्ताह, मरीमाता उत्सव, कानिफनाथ महाराज यात्रोत्सव होतो. दगू सगर हे लोकनाट्य कलावंत गावातील. 
वारकरी संप्रदायाची गावात सुरवात करणारे (कै.) गोविंद महाराज मोगल, भजनसम्राट (कै.) बाजीराव डेर्ले, मामासाहेब दांडेकर यांचा सहवास लाभलेले गायनसम्राट चंदुकाका डेर्ले अशी मांदियाळी आहे. दर वर्षी गावातून शिंगवे-जेजुरी पायी दिंडी निघते. कानिफनाथ पायी वारी होते. विशेष म्हणजे, दर महिन्याला शिंगवे ते नाशिक रामवारी काढून हरिहर भेट घडवून आणली जाते. पूर्वी हे जहागिरांचे गाव होते. कुस्ती, कबड्डीमध्ये इथल्या खेळाडूंनी राज्य अन्‌ राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. गावात पूर्वी बोहाडा होत असे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, गावाला निर्मलग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गावात हरण्या बैलाची समाधी आहे. नदीवर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला घाट अप्रतिम आहे. 

गावातील मंदिरांचा स्वतःचा इतिहास आहे. मंदिरांमधील चित्रांच्या खजिन्यांचा अभ्यास आणि संवर्धन होणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यात गोदावरीला पूर आल्यावर पाणी गावात शिरते. त्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होते. मात्र, त्यावर अद्याप उपाययोजना झालेली नाही. "गावगाडा' या पुस्तकाचे लेखन केले असून, प्रकाशकाअभावी ते प्रकाशित करता आलेले नाही. 
- रवी सगर, कवी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village