गोवर्धनेश्‍वर मंदिराचे गाव गोवर्धन

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नाशिक ः नाशिकच्या सीमेवरील अन्‌ गोदावरीच्या उजव्या तीरावर वसलेले गोवर्धन गाव. गोवर्धनेश्‍वर मंदिरावरुन गावाचे नाव गोवर्धन असे ओळखले जाते, असे ग्रामस्थ सांगतात. तसेच पूर्वी गावात हातमाग उद्योग मोठ्याप्रमाणात होता. इथल्या कापडी मागणी होती. पण गावात लागलेल्या आगीत हा उद्योग भक्ष्यस्थानी पडल्याच्या कटू आठवण सांगताना जून्या पिढीतील ग्रामस्थांना अस्वस्थ होते. 

नाशिक ः नाशिकच्या सीमेवरील अन्‌ गोदावरीच्या उजव्या तीरावर वसलेले गोवर्धन गाव. गोवर्धनेश्‍वर मंदिरावरुन गावाचे नाव गोवर्धन असे ओळखले जाते, असे ग्रामस्थ सांगतात. तसेच पूर्वी गावात हातमाग उद्योग मोठ्याप्रमाणात होता. इथल्या कापडी मागणी होती. पण गावात लागलेल्या आगीत हा उद्योग भक्ष्यस्थानी पडल्याच्या कटू आठवण सांगताना जून्या पिढीतील ग्रामस्थांना अस्वस्थ होते. 
गावात महादेव, बाणेश्‍वर, राम-हनुमान, देवी, जगदंबा माता, दत्त, खंडेराव मंदिर आहे. हनुमान मंदिरातील मूर्ती जून्या आहेत. राम नवमीला राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरी होतो. इथली होळी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ येतात. त्यादिवशी देवीच्या मंदिरात शास्त्रीय संगीताची मैफल होते. खंडेराव मंदिराजवळ चंपाषष्टी यात्रा भरते. जगदंबा माता मंदिरात नवरात्र मित्र मंडळाकडून विविध कार्यक्रम साजरे केले जातात. मंदिरातील देवीची आरती करण्याचा मान ग्रामस्थांना आहे. दररोज आरती केली जाते. हा मान ग्रामस्थांनी आपसात वाटून घेतला आहे. 
शहरीकरण उंबरठ्यावर येऊन ठेपलेले असतानाही गोवर्धनने गावपण जपले आहे. नाकील, जहागिरदार, वावलेकर असे वाडे गावात होते. त्यांची आता स्थिती बिकट झाली आहे. शिवाय पूर्वी गावात बोहाडे व्हायचे. त्यासंबंधीच्या आठवणी ग्रामस्थांनी मुखवट्यांच्या रुपाने जपून ठेवल्या आहेत. इथल्या मंदिरांच्या संवर्धनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गावात नव्याने बांधण्यात आलेले महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी मंदिर पाहण्यासाठी पर्यटक इथे येतात. 

मी सर्पमित्र आहे. आजपर्यंत दहा हजार साप पकडून जंगलात सोडून दिलेत. गावात साप मारू नये म्हणून मी गेल्या वीस वर्षांपासून जनजागृती करीत आहे. गावात सर्प उद्यान व्हावे व जखमी सापांचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. 
-दत्तात्रय देशमाने (सर्पमित्र) 

गावातील वाडे व मंदिरांचे संवर्धन व्हायला हवे. तसेच शेती मोठ्याप्रमाणात केली जात असल्याने शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या कार्यशाळा गावात व्हायला हव्यात. गावातील होळी हा सार्वजिक मोठा उत्सव असून पोळ्याला निघणाऱ्या मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी होते.
-रमेश गोधडे (शेतकरी) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village