कावडीची परंपरा जपणारा गाव बेलू 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

नाशिक ः बेलू (ता. सिन्नर) हे अडीच हजार लोकवस्तीचं गाव. गुढीपाडाव्याला सकाळी गावातील चारशे ते पाचशे तरुण पायी जाऊन नाशिकच्या गोदावरी नदीमधून कावडीमधून पाणी आणतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. त्याचदिवशी सायंकाळी गावातून रथयात्रा सोहळा साजरा होतो. दरवर्षी गावात सप्ताहाचा कार्यक्रम होतो. 

नाशिक ः बेलू (ता. सिन्नर) हे अडीच हजार लोकवस्तीचं गाव. गुढीपाडाव्याला सकाळी गावातील चारशे ते पाचशे तरुण पायी जाऊन नाशिकच्या गोदावरी नदीमधून कावडीमधून पाणी आणतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. त्याचदिवशी सायंकाळी गावातून रथयात्रा सोहळा साजरा होतो. दरवर्षी गावात सप्ताहाचा कार्यक्रम होतो. 
गावात हनुमान, शंकर, भैरवनाथ, कानिफनाथ, दत्त, विठ्ठल आणि जगदंबामाता मंदिर आहे. ग्रामदैवत वेताळबाबा यांचा यात्रोत्सव पंचक्रोषित प्रसिद्ध आहे. शिवजयंती, नवरात्रोत्सव धूमधडाक्‍यात साजरा होतो. गोविंद तुपे यांना पाण्यातून शेकडो लोकांना वाचविल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. माजी सैनिकाची मुलगी सुप्रिया तुपे हिने कुस्तीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. गावात अध्यात्मिक शाळा सुरू करणारे व वारकरी शिक्षण देणारे शिवचरित्रकार ज्ञानेश्‍वर माउली तुपे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला आहे. गावातील 22 तरुण लष्करात दाखल होऊन देशसेवेत आहेत. 
मुख्यमंत्री पेयजल योजनेतून गावासाठी पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर झाली आहे. गुरुकुल आणि व्यायामशाळेचे काम सुरू आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची एक कोटीची इमारत उभी राहिली आहे. गावात वाघे मंडळी आपली कला सादर करतात. दत्तू तुपे, भैरव बोडके या मल्लांनी कुस्तीच्या फडात नाव कमावले आहे. हे गाव कडवा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून, गावात दफनभूमी आणि दशक्रिया विधीशेड आवश्‍यक आहे. 

आमचा गाव समृद्धी महामार्गाजवळ असून, गावात दारणाच्या जुन्या योजनेतून पाणी आणले जाते. पण पाणी पुरेसे ठरत नसल्याने आता नवीन योजना मंजूर झाली. ही योजना पूर्ण होण्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल. 
- संजय वारुंगसे, प्रभारी सरपंच 

गावात वेताळबाबांची यात्रा भरते. यात्रेत तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. पण गावातील शाळेत शिक्षक कमी असल्याने विद्यार्थांची शैक्षणिक अडचण होते. शिवाय गावातील रस्ते चांगले होणे आवश्‍यक आहे. 
-युवराज तुपे, ग्रामस्थ 

मी मुलांना अध्यात्मिकतेचे धडे देत आहे. अध्यात्मिक शाळा सुरू करणारे पंचक्रोषितील पहिले गाव आहे. गुरुकुलाच्या माध्यमातून इतर गावातील मुलांना त्याचा फायदा होईल. 
- ज्ञानेश्‍वर माउली तुपे, ग्रामस्थ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village