खापराळेकरांचे दूध हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन 

Live Photo
Live Photo

नाशिक ः खापराळेकरांचे दूध हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. दुष्काळी गावाची लोकसंख्या पाचशे इतकी असून, दोन गावांची सामूहिक ग्रामपंचायत आहे. गावात हनुमान, कशीआई, गणपती, चॉंदखाबाबा आणि देवीच्या डोंगरावर आई भवानीमाता अशी मंदिरे आहेत. पोळा धूमधडाक्‍यात साजरा करण्यात आलाय. 
सिन्नर तालुक्‍यातील खापराळे गावातील प्रत्येक घरात गायी-म्हशी आहेत. दरररोज बाराशे लिटर दूध गावातून विक्रीसाठी जात असते. म्हशींचे प्रमाण अधिक असून, त्यात गीर, जाफराबादी, पंढरपुरी, म्हसाण जातीच्या म्हशींचा समावेश आहे. डांगी गायी मोठ्या प्रमाणात आहेत. अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावाने ग्रामस्थ साजरा करतात. विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात विहीर कोरडी पडल्यावर टॅंकर हा पिण्याच्या पाण्यासाठी आधार असतो. टॅंकर आला नाही, तर महिलांना आठ ते दहा किलोमीटरवरून डोईवरून पाणी वाहावे लागते. गावातील प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. शाळेचे छत धोकादायक बनले असल्याने एका खोलीत चार वर्ग भरविले जातात. 
पशुधनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची व्यवस्था नसल्याने जनावरांच्या उपचारासाठी थेट सिन्नर गाठावे लागते. कोका-कोला कंपनीच्या सहकार्याने वॉटर संस्थेच्या संजीवनी उपक्रमांतर्गत गाव दत्तक घेतले गेले. मात्र गावात अद्याप विकासकामांना वेग आलेला नसल्याची ग्रामस्थांची खंत आहे. यंदाच्या पावसाने गावाचे मोठे नुकसान झाले. पीक वाया गेले. गावातील अनेक घरे पडली आहेत. पण पंचनामा झाला नसल्याने भरपाई मिळण्याची शक्‍यता नजरेच्या टप्प्यात दिसत नसल्याने ग्रामस्थ नाराजीचा सूर आळवत आहेत. गावाच्या शिवारातील पवनचक्‍क्‍यांमुळे तरुणांना रोजगार मिळतो आहे. पवनचक्कीच्या एका टॉवरमागे गावाला वर्षाला 24 हजारांचे उत्पन्न मिळते. असे सात टॉवर शिवारात आहेत. त्याच वेळी तीन बोअरच्या कमी झालेल्या पाण्यामुळे ग्रामस्थ चक्रावले आहेत. 

आमच्या गावात पशुधन मोठ्या प्रमाणात असल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यांची आवश्‍यकता आहे. याशिवाय इमारतीची दुरवस्था झाल्याने अंगणवाडी भाड्याच्या जागेत भरवावी लागते. प्राथमिक शाळेत दोन शिक्षक एका वर्गात चार वर्गांना शिकवितात. गावाचा रस्ता अजून झालेला नाही. पुराच्या पाण्यामुळे गावात मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कधी मिळणार हे माहिती नाही. 
-अशोक सदगीर, माजी उपसरपंच 

उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. आमच्या गावाचे प्रमुख पीक भात असून, पावसाने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्यामुळे भात सडून गेला. आमची जनावरे आजारी पडल्यावर खासगी डॉक्‍टरांना बोलावून उपचार करून घ्यावे लागतात. गावात बॅंक शाखा नसल्याची अडचण जाणवते. 
-त्र्यंबक सदगीर, ग्रामस्थ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com