सह्याद्रीच्या कुशीत वसलेले विळवंडी गाव

residential photo
residential photo

नाशिक ः सह्याद्रीच्या कुशीत वसलेले वळवंडी (ता. दिंडोरी) गाव. जैवविविधतेने बहरलेल्या गावाची लोकसंख्या पाच हजारांपर्यंत आहे. याच गावातून आदिवासी तरुणाने फिल्मी दुनियेत "एन्ट्री' केली, तसेच याच गावातील तरुण कऱ्हाडमध्ये शल्यचिकित्सक म्हणून सेवा बजावत आहे. 
गावात मारुती, विठ्ठल-रुखुमाई, गणपती, शंकर अशी मंदिरे आहेत. ग्रामदैवत धुळई डोंगरावर आहे. पूर्वी गावात ग्रामदेवतेचा पांढरी उत्सव, बोहाडे व्हायचा. आता हरिनाम सप्ताह होतो. सोमनाथ बेंडकुळे कीर्तनकार, लक्ष्मण वाघेरे गायक, शंकर वाघेरे, सुदाम पालवी, तुकाराम वाघेरे वादक, काशीनाथ बेंडकुळे, शरद बेंडकुळे, सीताराम डमळे, नामदेव मौली ज्येष्ठ मल्ल अन्‌ (कै.) गणपत वाघेरे स्वातंत्र्यसैनिक. गावात आठवीपर्यंत शाळा, व्यायामशाळा आहे. गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका-वाचनालयाची आवश्‍यकता भासते. गावाला धैर्यशीलराजे पवार यांनी भेट दिली. गावात भजनी मंडळ आहे. दिव्यांग वादक (कै.) किसन वाघेरे यांनी वादक तयार केले होते. आदिवासी तरुण विजयकुमार घोटे याच गावातून चित्रपट निर्माता बनले होते. घोटे मूळचे शेजारील धागोरचे. त्यांनी तयार केलेल्या लघुपटाला चित्रपट महोत्सवात दुसरा क्रमांक मिळाला होता. त्यांनी विविध चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. आदिवासी परंपरेची ओळख व्हावी म्हणून विजयची धडपड सुरू होती. कौठवाडी (जि. नगर) येथील डोक्‍यावर पेटलेली मडकी घेऊन फिरणाऱ्या आदिवासींची जत्रा विजयने कॅमेराबद्ध केली. त्याच्यावर लघुपट बनवला. विशेष म्हणजे, त्यासाठी पैसे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जमा केले. या लघुपटाचा समावेश आदिवासी फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आला होता. विजय चित्रपट निर्माता बनले. त्यांचा "वेडे मन तुझ्यासाठी' हा मराठी चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे, पण तत्पूर्वी त्यांचे निधन झाले. विजय यांच्याशी संवाद झाला होता. त्या वेळी त्यांनी आजोबांचे गाव म्हणून विळवंडीविषयी आकर्षण असल्याचा भाव मांडला होता. पुढील चित्रपटाचे चित्रीकरण याच गावातून करण्याचा मानस त्यांचा होता. 
विळंवडी शिवारात आळंदी नदीचा उगम झाला आहे. गावातील विहिरीचे पाणी टाकीत साठवून ते गावातील घरांत पोचवण्यात येते. गावात बॅंकेची शाखा नसल्याने ग्रामस्थ व तरुणांना बॅंकिंग व्यवहारासाठी पेठ अथवा दिंडोरीला जावे लागते. 

गावात वाचनालय-अभ्यासिका नसल्याने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात अडचणी येतात. गावातील अनेक उत्सव बंद झाले आहेत. ते पुन्हा सुरू व्हायला हवेत. धुळई डोंगराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हायला हवा. 
- सीताराम डगळे, शेतकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com