झुल्फिकार अली भुट्टो अन बेनझीर भुट्टोंशी जोडलेले इंदोरे 

Live Photo
Live Photo

नाशिक ः पाकिस्तानचे नववे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो आणि त्यांची कन्या बेनझीर भुट्टो यांच्याशी जोडले गेलेले इंदोरे (ता. दिंडोरी) गाव. या गावाची लोकसंख्या दोन हजार 134 इतकी आहे. जय मल्हार उपसा सिंचन योजनेच्या एका टाकीतून शेतकऱ्यांना पाणी दिले जाते. जिल्ह्यातील सुस्थितीत चालणारी ही योजना पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी गावाला भेट दिलीय. 

नाशिकच्या तळेगाव फाट्यावरून 3 किलोमीटर आत गेल्यावर इंदोरे गावात पोचता येते. गावात मारुती, दत्त, नवनाथ, कानिफनाथ, महादेव ही मंदिरे आणि बुद्धविहार आहे. हनुमान जयंतीला गवत यात्रोत्सव होतो. गावाजवळून धामण नदी वाहते. गावाजवळील पाझर तलावातून गावाला पाणीपुरवठा होतो. त्याकाळी दुष्काळामुळे गावाची लोकसंख्या कमी होऊ लागली होती. गाव निर्मनुष्य व्हायला लागले होते. अश्‍यावेळी झुल्फिकार अली भुट्टोंची एक विहीर गावाला बक्षीस म्हणून मिळाली. एका विहीरीने 750 लोकसंख्येला पाण्याची व्यवस्था झाली. दुष्काळी गाव बागायती झाले आहे. गावात इंदूरकडून लोक आल्याने गावाची ओळख इंदोरे म्हणून झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे गाव "पेसा' अंतर्गत समाविष्ट आहे. 

इंदोरे गावात 14 गटांमध्ये बेनझीर भुट्टो यांच्या वडिलांची जमीन होती. तत्कालीन एका गटात सर्वसाधारणपणे दीड हजार हेक्‍टर जमीन होती. गावातील हनुमान मंदिराजवळ त्यांचा मोठा बंगला होता. आता फक्त काही अवशेष शिल्लक आहेत. गावात हनुमानाचे जूने मंदिर आहे. त्याशेजारी चॉंदशावाली बाबा दर्गा आहे. हिंदू-मुस्लीम सलोख्याची परंपरा भुट्टो परिवाराच्या काळापासूनचा आहे. हिंदू-मुस्लिम एकोपा हे गावचे वेगळेपण असल्याचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. झुल्फीकार अली भुट्टो परिवाराने बेनझीर भुट्टो आईच्या पोटात असताना भारत सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आताच्या पिढीपर्यंत पोचली आहे. त्यावेळी इंदोरेतील भुट्टोंच्या जमिनीचा सर्व कारभार नाशिकमधील वकील पाहत असत. 
 
पर्यटन विकासाची अपेक्षा 
पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता मिळाल्यास गावाचा विकास होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे. गावात व्यायामशाळा, वाचनालय, दवाखाना नाही. सातवीपर्यंतची शाळा गावात आहे. बॅंकेची शाखा गावात नसल्याची खंत ग्रामस्थांमध्ये आहे. गावात भजनी मंडळ असून दरवर्षी हरिनाम सप्ताह होतो. पहिलवान (कै.) हलीम मदगुल पंचक्रोशित प्रसिद्ध होते. गावात पंचमुखी हनुमानाचे मंदिर बांधण्याचे काम सुरु आहे. तसेच शिवारात दहा कुक्कुटपालन व्यवसायिक आहेत. राजगिरा लाडू बनविण्याचा कारखाना गावाजवळ आहे. अहिल्याबाई होळकरांची बारव गावात असून चिरा आहे. 

गावाचा इतिहास मोठा आहे. बेनझीर भुट्टोंचे गाव म्हणून देशभरात इंदोरे ओळखले जाते. मात्र आमचा गाव अपेक्षित विकासापासून दूर राहिला. वाचनालय आणि अभ्यासिका नाही. आम्ही गाव आदर्श करण्यासाठी प्रयत्न करीत असून पर्यटन क्षेत्र कसे करता येईल यादृष्टीने विचार सुरु आहे.
- लीलाबाई गवळी (उपसरपंच) 

सुस्थितीतील उपसा सिंचन योजना हे गावाचे वैशिष्ट्य आहे. गावातील शाळा डिजिटल आहे. शेतीबरोबर व्यवसायात ग्रामस्थ रस घेऊ लागले आहेत. 
- अनिल सुपे (ग्रामसेवक) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com