बोहाड्याच्या शतकी वर्षांच्या परंपरेचे गाव धामणगाव 

Live Photo
Live Photo

नाशिक ः धामणगाव (ता. इगतपुरी) हे पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावातील बोहाड्याला शतकी वर्षांची परंपरा आहे. एसएनबीटी महाविद्यालय अन्‌ रुग्णालय संकुलाने गावाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली. सोमनाथ देशमुख यांच्या शेतात नांगरताना दोन दगडी प्राचीन जैन तीर्थंकरांच्या मूर्ती सापडल्या. मात्र त्यांच्या अभ्यासासाठी अद्याप कुणी फिरकले नाही. या मूर्तींमुळे जैन मंदिर असण्याची शक्‍यता ग्रामस्थांना वाटते. 
गावातील रस्त्यावर नंदी बैलाचे मंदिर आहे. हे मंदिर भरवीर (खुर्द) गावाच्या शिवारात येते आणि येथून पुढे धामणगावचे शिवार सुरू होते. धामणगावमध्ये मारुती, गणपती, खंडेराव, सप्तशृंगी, मरिआई, महादेव, म्हसोबा आणि वेताळबाबांचे मंदिर आहे. मारुती यात्रोत्सावात कुस्त्यांची दंगल होते. दत्ता महाराज वाघ आणि अर्जुनबाबा गाढवे हे कीर्तनकार गावचे. गावातून त्र्यंबकेश्‍वर-आळंदी-पंढरपूर दिंडी काढली जाते. गावाबाहेर अहिल्याबाई होळकरांची जुनी बारव आहे. तिची अवस्था बिकट झाली आहे. गावातील (कै.) नामदेव मोरे या पहिलवानांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. आता पहिलवान कैलास जाधव तरुणांना कुस्ती शिकवतात. गावात शाळा, आश्रमशाळा आहे. पण वाचनालय नाही. उन्हाळ्यात गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. कडवा व दारणा नदीच्या मध्ये असलेल्या गावातील रिक्षावाला नीलेश गाढवे पखवाजवादक म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. बारमाही बागायती गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्‌घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले आहे. 


गावाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या दोन टाक्‍यांमध्ये पाणी आले नाही. गावातील बारवचे संवर्धन व्हायला हवे. तसेच जैन तीर्थंकारांच्या मूर्तींचा अभ्यास होण्याची आवश्‍यकता आहे. गावात कुक्‍कुटपालन आणि दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. या व्यवसायाच्या प्रशिक्षण कार्यशाळांची गरज आहे. 
- महेश गाढवे, शेतकरी 


गावामध्ये सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होताता. धरणाजवळ गाव असूनही उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. गावात अनेक वाडे आहेत. बारा बलुतेदार गावात गुण्यागोविंदाने वास्तव्य करतात. तरुणाईला एसएमबीटी संकुलामुळे रोजगाराची संधी मिळाली. 
- नंदू गाढवे, माजी सरपंच 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com