गवळी राजवटीतील गाव पिंपळगाव डुकरा 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नाशिक ः गवळी राजवटीमधील गाव म्हणून पिंपळगाव डुकरा (ता. इगतपुरी) गावाची ओळख पुढे येते. इथल्या गवळी राजवटीमधील गवळी वाड्याचे अवशेष शिल्लक आहेत. गवळी बारवच्या संवर्धनाचा प्रश्‍न तयार झाला आहे. गावाजवळील प्राचीन हेमाडपंती शिवमंदिर हा अभ्यासाचा विषय बनला आहे. 

नाशिक ः गवळी राजवटीमधील गाव म्हणून पिंपळगाव डुकरा (ता. इगतपुरी) गावाची ओळख पुढे येते. इथल्या गवळी राजवटीमधील गवळी वाड्याचे अवशेष शिल्लक आहेत. गवळी बारवच्या संवर्धनाचा प्रश्‍न तयार झाला आहे. गावाजवळील प्राचीन हेमाडपंती शिवमंदिर हा अभ्यासाचा विषय बनला आहे. 
शिवमंदिराचे कोरीव काम आणि कोरीव मूर्ती आकर्षित करतात. मंदिराबाहेर दहा ते पंधरा चिरा असून, त्यासारख्या चिरा इतरत्र आढळत नाहीत. या चिरा गावाचा इतिहास पुढे येण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. तीन हजार लोकवस्तीच्या गावात शंकर, मारुती, भवानी, मरीआई, भैरोबा मंदिर आहेत. रंगपंचमीला गावात मारुती यात्रोत्सव होतो. परिसरातील सहा गावांसाठी इथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. गावात सातवीपर्यंत शाळा असली तरीही वाचनालय, व्यायामशाळा नाही. गावाजवळून समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. गावातील (कै.) धोंडिराम भगत, (कै.) पांडुरंग झनकर यांनी कुस्तांचे फड गाजवले. त्यांची परंपरा अविनाश सहाने, सदा सहाने हे पुढे नेत आहेत, सांभाळत आहेत. गावात भजनी मंडळ असून, कचरू वाकचौरे, पांडू वाकचौरे, आनंदा डुकरे, भैरव डुकरे, सोमनाथ वाकचौरे, कोंडाजी वाकचौरे हे गीतगायन करतात. 
गावाजवळील कडवा धरणाच्या उद्‌घाटनासाठी माजी संरक्षणमंत्री शरद पवार आले असल्याची आठवण ग्रामस्थ सांगतात. गावातील दहा तरुण सैन्यदलात आहेत. हे गाव तमाशा कलावंतांचे म्हणूनदेखील ओळखले जाते. गावात पूर्वी तीसपेक्षा अधिक तमाशा कलावंत होते. (कै.) कारभारी सातकर, (कै.) खंडू भगत, (कै.) सोना काठे, (कै.) खंडू वाकचौरे आदी कलावंत पंचक्रोशित प्रसिद्ध होते. भात, कांदे-बटाटा आदी पिके घेतली जातात. यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. 

आमच्या गावातील गवळीवाडा हा गवळी राजवटीच्या पाऊलखुणा दर्शविणारा होता. त्याच्या दगडी चिरा पाच फूट लांब अखंड आहेत. आता या ठिकाणी अवशेष उरले आहेत. पण दगडावरील कलाकुसर अजूनही लक्ष वेधून घेते. गावाबाहेरील प्राचीन शिवमंदिर सुंदर आहे. 
- किसन वाकचौरे, ज्येष्ठ 

आमच्या गावात अनेक उत्सव होतात. वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारे आमचे गाव आहे. गावात पूर्वी अनेक तमाशा कलावंत होते. ते जिल्हाभर आपली कला सादर करत असत. आता जुनी संस्कृती टिकून ठेवण्यासाठी नवीन पिढीने पुढे येणे आवश्‍यक आहे. 
- यमुनाबाई भगत, ज्येष्ठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village