सातपूरमध्ये इंग्रजांच्या मिलिटरीचा तीन वर्षे तळ 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नाशिक ः देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या 1942 च्या "चले जाव' आंदोलनावेळी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्या वेळी स्वातंत्र्यसैनिकांना पकडण्यासाठी इंग्रजांनी "मिलिटरी'चा तळ ठोकला होता. इंग्रजांचे सैन्य तीन वर्षे होते. औद्योगीकरणाने जगाच्या नकाशावर पोचलेल्या अन्‌ नाशिक महापालिका क्षेत्रातील महसुलाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले सातपूर जाज्वल देशभक्तीने प्रेरित होते. 

नाशिक ः देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या 1942 च्या "चले जाव' आंदोलनावेळी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्या वेळी स्वातंत्र्यसैनिकांना पकडण्यासाठी इंग्रजांनी "मिलिटरी'चा तळ ठोकला होता. इंग्रजांचे सैन्य तीन वर्षे होते. औद्योगीकरणाने जगाच्या नकाशावर पोचलेल्या अन्‌ नाशिक महापालिका क्षेत्रातील महसुलाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले सातपूर जाज्वल देशभक्तीने प्रेरित होते. 
गावाचे नाव पूर्वी सतीपूर होते. त्यानंतर सय्यदपूर झाले. आता सातपूर म्हणून ओळख अधोरेखित आहे. वीस हजार लोकवस्तीचा गाव रस्त्यांवरून सिमेंटच्या जंगलासारखे दिसत असले, तरी कौलारू घरे गावाचे वैभव आहे. गावाशेजारून नंदिनी नदी वाहते. ग्रामदैवत जगदंबामाता, हनुमान, दुर्गामाता, शनी, महादेव, दत्त, वेताळबाबा, मरीआई, संतोषीमाता, सावता महाराज, खंडेराव अशी मंदिरे आहेत. पीरबाबाची दर्गा आणि रजविया मशीद आहे. गावात गुढीपाडव्याला देवीचा यात्रोत्सव होतो. बारागाड्या ओढण्याची शतकी परंपरा गावाने जोपासली आहे. बारागाड्या ओढण्याचा मान निगळ कुटुंबाला आहे. गावात होलिकात्सव हर्षोल्हासात होतो. होळीच्या दुसऱ्या दिवशी वीर नाचविले जातात. होळी प्रज्वलित करण्याचचा मान घाटोळ घराला, तर पूजा करण्याचा मान सोनवणे कुटुंबाला आहे. गावात दर वर्षी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. वारकऱ्यांचा मुक्काम, भोजनाची व्यवस्था गावातर्फे केली जाते. शिवाय 31 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. गावातील भजनी मंडळात राजाराम निगळ, त्र्यंबक भंदुरे, कमला काश्‍मिरे आदींसह तरुणाईचा सहभाग असतो. गावात दोन कोळीवाडे आणि एक राजवाडा आहे. गावात पूर्वी भंदुरे, भोर, बंदावणेवाडा गावाची शान होती. त्यांची आता अवस्था बिकट आहे. गावातील वेताळ मंदिराला छत आहे. मंदिरातील बोहाड्याचे मुखवटे लक्ष वेधून घेतात. 
संत जनार्दन स्वामींनी गावातील शनिमंदिराची प्राणप्रतिष्ठा केली आहे. गावाजवळ औद्योगिक क्षेत्र असले, तरीही स्थानिकांपैकी 80 टक्के जण शेती करतात. (कै.) श्रीहरी निगळ, (कै.) पाराजी निगळ, (कै.) नारायण भंदुरे, (कै.) अनाजी घाटोळ या मल्लांनी त्या काळी कुस्त्या जिंकल्या होत्या. राजाराम निगळ प्रवचनकार, त्र्यंबक निगळ वीणावादक, एकनाथ भंदुरे मृदंगवादक गावचे. 1962 मध्ये इंदिरा गांधी आणि 1952 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू गावात आल्याच्या आठवणी आताच्या पिढीपर्यंत पोचल्या आहेत. अभिनेते शशी कपूर यांनीही गावाला भेट दिली आहे. अभिनेते निळू फुले यांनी "अकलेचा कांदा' या नाटकाचा प्रयोग गावात केला. पूर्वी बोहाडा, संगीतमेळा होत असे. त्याद्वारे स्थानिक कलावंतांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हायचे. नवरात्रोत्सवात गावात एकाच शक्तिदेवीची प्रतिष्ठापना केली जाते. गावातून दर वर्षी मशालयात्रा काढली जाते. सप्तशृंगगडावरून मशाल गावात आणली जाते. 
स्वीमिंगमध्ये गावातील अनेक मुलांनी यश मिळविले आहे. ओम भंदुरे, एंजल घोडे, ऋषी आहेर, साईल निगळ यांनी समुद्रात दोन किलोमीटरच्या स्पर्धेत भाग घेतला. ऋषी निगळ या दिव्यांग विद्यार्थ्याचा स्पर्धेत सहभाग राहिला. याशिवाय सात मुले वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत. गावातून सावता माळी महाराजांची मिरवणूक काढली जाते. गावात दीडशे वर्षांची चावडी सुस्थितीत आहेत. (कै.) वामन काळे यांच्या वंशजांनी ती बांधल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. चावडीची भिंत दोन फूट रुंद आहे. सागाच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे. कैकाडी महाराजांना गाव खूप आवडले होते. त्यांनी या ठिकाणी मठ उभारण्याची इच्छा स्थानिकांपुढे मांडली होती. 

वयाच्या 82 व्या वर्षी दररोज दोन तास नियमित व्यायाम करतो. मला बासरी वाजविण्याचा छंद असून, पोवाडा आणि भक्तिगीते सादर करतो. गावाची जडणघडण बघितली आहे. अनेकदा पायी पंढरपूर वारी केली आहे. 
- राजाराम निगळ, माजी पोलिसपाटील 

गावात वारकरी संप्रदाय वृद्धिंगत व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. मुलांना संप्रदायाचे धडे गिरवायला लावतो. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात गावातील तीनशे वारकऱ्यांचा सहभाग असतो. 
- त्र्यंबक भंदुरे, वारकरी 

पोहण्याचे प्रशिक्षण देतो. त्यात दिव्यांग मुलांचा समावेश आहे. याशिवाय आजपर्यंत मी अडीचशे जणांना वाचविले आहे. 
- अनिल निगळ, जीवरक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village