कुशेगावचे वानरांचे जंगल प्रसिद्ध 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

नाशिक ः वाडीवऱ्हे ते त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील कुशेगाव. इथले वानरांचे जंगल प्रसिद्ध आहे. मात्र ऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित राहिले आहे. गावात रामाचे मंदिर अन्‌ ऐतिहासिक बारव हे गावाचे वैभव आहे. 

नाशिक ः वाडीवऱ्हे ते त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील कुशेगाव. इथले वानरांचे जंगल प्रसिद्ध आहे. मात्र ऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित राहिले आहे. गावात रामाचे मंदिर अन्‌ ऐतिहासिक बारव हे गावाचे वैभव आहे. 
वानरांचे जंगल म्हणून ओळखली जाणारी ती किश्‍किंदा नगरी. सुग्रिवाची राजधानी म्हटले जाते. देशात चार ठिकाणी किश्‍किंदा नगरी असल्याचा दावा केला जातोय. त्यात बिहार, आंध्र प्रदेश, दक्षिण आणि नाशिक असल्याची दंतकथा आहे. नाशिकमधील किश्‍किंदा नगरी म्हणून कुशेगावचा साधूंकडून सातत्याने उल्लेख केला जातो. इथे रामाच्या मंदिरासमोर बारव आहे. कडक उन्हाळ्यातसुद्धा बारव पाण्याने भरलेली असते. बारवमधून परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळते. डोंगराच्या खाली असलेल्या बारवेची अवस्था मात्र बिकट झाली आहे. तिच्या संवर्धनाचे प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. विकासासाठी सरकारकडून दीड कोटी मंजूर झाल्याची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोचविण्यात आली. मात्र दोन वर्षे झाली, तरी मंदिरासाठी एक रुपया मिळाला नसल्याची ग्रामस्थांची व्यथा आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-संतांप्रमाणे भक्तांची इथे रीघ लागलेली असते. एरवी साधूंचा राबता असतो. म्हणूनच इथे संतधाम, अतिथिगृह, विद्युत व्यवस्था होणे महत्त्वाचे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

वनौषधींचे माहेरघर 
औषधी वनस्पतींचे कुशेगावचा शिवार माहेरघर आहे. हा परिसर अंजनेरीच्या मागील बाजूस येत असून, डोंगराच्या पायथ्याशी तो वसलेला आहे. परिसरात वन विभागाच्या जमिनीत मोठी वनसंपदा आहे. इथे निरगुडी, अडुळसा, गुळवेल आदींबरोबर मोठ्या प्रमाणात वृक्ष बघावयास मिळतात. सकाळच्या प्रहरी पक्ष्यांचा किलबिलाट होतो. या भागाला तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाल्यास पाड्यांपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तीन हजारांपर्यंत लोकवस्ती असलेल्या गावात मारुती, वेताळ आणि देवीचे मंदिर आहे. हे पूर्ण आदिवासी गाव असून, "पेसां'तर्गत समाविष्ट आहे. इथे भजनी मंडळ असून, नवसू सराई, शंकर कातोरे, प्रभाकर सोनवणे, राजू सराई, देवराम सराई यांचा त्यात सहभाग असतो. पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहे. पाण्याची मोठी अडचण गावाला असून, अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे. गावात दवाखाना नसल्याने रुग्णांना वाडीवऱ्हे अथवा घोटीपर्यंत न्यावे लागते. गावातील बोहाडा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यासाठी वापरण्यात येणारे मुखवटे घरांमध्ये पाहावयास मिळतात. 

गावाच्या आजूबाजूला अनेक आदिवासी पाडे आहेत. या क्षेत्राचा विकास झाल्यास रोजगार उपलब्ध होईल. वनसंपदेचे संवर्धन होत त्यात वृद्धी होईल. पर्यटकांना आदिवासी संस्कृतीची माहिती मिळेल. गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळायला हवा. 
-कमल सराई, सरपंच 

आमचा गाव इगतपुरी तालुक्‍यातील शेवटचे टोक. परिसरात दाट जंगल आहे. गावात दवाखाना नसल्याने रुग्णांचे खूप हाल होतात. पिण्याचे पाणी आणण्यासाठी महिलांना दोन किलोमीटर लांब जावे लागते. गावात व्यायामशाळाही नाही. 
-शंकर सराई, ग्रामस्थ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village