इगतपुरीचे पहिले आमदार पुंजाबाबा गोवर्धनेंचे सांजेगाव 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

नाशिक ः स्वातंत्र्यपूर्व अन्‌ स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकऱ्यांचे नेते, भातभाव लढ्याचे प्रणेते कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांचे सांजेगाव. इगतपुरीचे पहिले आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. पांढरी दाढी, हातात काठी घेतलेले पुंजाबाबा म्हणजे, "ओल्ड यंग मॅन', असा त्याकाळी विधानसभेचा कुतुहलाचा विषय बनले होते. गावात सामुदायिक लग्न लावून देण्याची परंपरा आहे. वीस वर्षापूर्वी ती सुरु झाली असून पहिल्याच वर्षी 21 सामुदायिक लग्न गावाने लावली होती. 

गावात मारुती, वेताळबाबा, मरीआई, दत्त ही मंदिरे आहेत. साडेतीन हजार लोकवस्तीच्या गावात शिवजयंतीला वेताळबाबांचा यात्रोत्सव होतो. गेल्या तीस वर्षांपासून हरिनाम सप्ताह होतो. राम जाधव हे कीर्तनकार गावातील. गेनू जाधव, आनंद गोवर्धने, त्र्यंबक काळे, तुकाराम डेरींगे, राम गोवर्धने, नानू पगार हे भजनी मंडळात भजन म्हणतात. गावातील तालीमची अवस्था बिकट झाली आहे. तालमीत व्यायामाचे साहित्य वर्गणी गोळा करून आणले आहे. या गावात पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आहे. गावाशेजारून उंटवड नदी वाहते. शिवाय जवळ मुकणे धरण आहे. पहिलवान गोटीराम गोवर्धने, सुदाम गोवर्धने, शिवाजी गोवर्धने, रोहिदास गोवर्धने, सुरेश गोवर्धने, संपत गोवर्धने, भूषण लहामगे, दत्तू गोवर्धने आदी मल्लांनी राज्यस्तरापर्यंत यश मिळवले आहे. 

भाताला दुग्धोत्पादनाची जोड 
सांजेगावचे मुख्य पीक भात असून शेतकऱ्यांनी अर्थाजर्नासाठी दुग्धोत्पादनाची जोड दिलीय. गावातून रोज पाच हजार लिटर दुध विक्रीसाठी जात असते. गावातील रस्ते घराब झाले असून पुरामुळे भाताचे मोठे नुकसान झाले. काही घरे पडली आहेत. गावातील विखुरलेले चिरे आजही गावाच्या इतिहासाची साक्ष देत आहेत. गावातील स्मशानभूमीला यंदाच्या अतिवृष्टीत मुकणे धरणाच्या पाण्याने वेढले आहे. गावात बसगाडी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होतात. जिल्हा बॅंक आर्थिक अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

सांजेगावची स्मशानभूमी मुकणे धरणाच्या पाण्यात गेली आहे. त्यामुळे गावात आणखी एक स्मशानभूमी उभारण्याचा आमचा विचार आहे. शिवाय गावातील रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्याचा आमचा प्रयत्न असून गाव सौर ऊर्जेवर सक्षम करण्याचा आमचा मानस आहे. 
- नीता गोवर्धने (सरपंच) 

आमच्या गावात पशुवैद्यकीय दवाखाना व्हायला हवा. तसेच आरोग्याचे प्रश्‍न निकाली निघावेत म्हणून गावात निवासी डॉक्‍टर पाहिजे.
- बाळू गोवर्धने (शेतकरी) 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village