चाळीसगाव : वरखेडे परिसर झाला जलमय

दीपक कच्छवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

‘सकाळ’मुळे वरखेडे तांडा व वरखेडे गाव परिसर जलमय झाला आहे.ज्याचा सुमारे तीनशे हेक्टर शेतीला फायदा होणार आहे. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)  : ‘सकाळ रिलीफ फंड’मधून वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामामुळे या भागात दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसात सुमारे दोन कोटी लीटर पाणी साचले असून एक कोटी लीटर पाणी जमिनीत जिरले आहे. त्यामुळे या भागात तब्बल तीन कोटी लीटर पाणी जमा झाल्याने ‘सकाळ’मुळे वरखेडे तांडा व वरखेडे गाव परिसर जलमय झाला आहे.ज्याचा सुमारे तीनशे हेक्टर शेतीला फायदा होणार आहे. 

परीसरात पहिल्यांदाच पाणी अडवल्या गेल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘तनिष्का’ सदस्यांच्या पुढाकाराने ‘सकाळ रिलीफ फंड’मधून वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे नाला खोलीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले.आतापर्यंत या परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना काही भागातील शेतशिवारात उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागत होता. त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्राप्तिकर आयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण (मुंबई) यांनी पाणीटंचाई दूर कशी होईल, यासंदर्भात मार्गदर्शन लाभले.

ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह ग्रामस्थ व युवकांना एकत्र करून जलसंधारणाचे काम हाती घेतले. यासाठी ‘सकाळ’च्या ‘तनिष्का’ गटाच्या महिलांनी पुढाकार घेतला. ‘सकाळ माध्यम समुहा’कडे निधीची मागणी ‘तनिष्कां’नी केली. येथील पाणीटंचाई व विहिरींची खालावलेली पाण्याची पातळी लक्षात घेता, ‘सकाळ रिलीफ फंड’मधून निधी मंजूर करण्यात आला व तब्बल तीन ठिकाणी काम करुन दोन किलोमीटरपर्यंत नाला खोलीकरणाचे काम मे महिन्यात करण्यात आले. यासाठी तनिष्का गटातील
सदस्यांचा मोठा वाटा आहे.

‘भगिरथाचा वारसा’ जागवला- ‘सकाळ’च्या विश्‍वासार्हतेवर सहभागाची मोहोर उठवणाऱ्या ‘सकाळ’च्या वाचकांनी दिलेल्या भरघोस मदतीच्या पाठबळावर ‘सकाळ रिलीफ फंड’ने हाती घेतलेल्या ओढे, नाले, तलावांतील गाळ काढण्याच्या मोहिमेत राज्यातील अनेक गावांमधील पाणीटंचाईचा बिकट प्रश्न कायमस्वरूपी नष्ट झाला आहे. वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे झालेल्या दमदार पावसामुळे या नाल्यातील साचलेले एक कोटी लीटर पाणी जमिनीत मुरले आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’तून मिळालेल्या मदतीच्या जोडीला लोकवर्गणी, श्रमदान आणि यंत्रसामग्रीसह इंधनाची मदत उभी करून येथील ग्रामस्थांनी ‘भगिरथाचा वारसा’ जागवला आहे.

सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्राला होणार लाभ- वरखेडे गावाचे एकूण क्षेत्रफळ साडेनऊशे हेक्टरवर आहे. त्यापैकी सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्राला नाल्यातील पाणीसाठ्याचा फायदा होणार आहे. या भागात गेल्या दहा वर्षांत प्रथमच असा पाणीसाठा हा केवळ ‘सकाळ’मुळे दिसत असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. या भागातील विहिरींनाही साचलेल्या पाण्याचा फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाला ‘सकाळ रिलीफ फंड’ची मोलाची मदत झाली आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत उपाययोजनांसाठी जलसंधारणाच्या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ‘सकाळ’ माध्यम समूहाचे ग्रामस्थांनी
आभार मानले आहेत.

वरखेडे गावालगत असलेल्या तांडवस्ती,दरेगाव भागातील नाला,चिंचलवन परीसरात झालेले काम ह्या सर्व कामांचा वेगळाच ठसा उमटला आहे.आता सर्वञ डोळ्यांसमोर पाणी दिसत असल्याने विहिरींच्या पातळीही निश्‍चितच वाढणार आहे. शेतीसिंचनाचा देखील प्रश्न सुटणार आहे.आम्ही 'सकाळ' माध्यम समुहाचे कायम रुणी राहु. - अर्चना पवार ,सरपंच वरखेडे 
 

‘सकाळ रिलीफ फंड’मधून झालेल्या कामामुळे परिसरात एक वेगळाच आदर्श निर्माण झाला आहे. यामध्ये ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे देखील मोलाचे योगदान आहे. या पाण्यामुळे आमचा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे.- सविता राजपुत, नगरसेविका चाळीसगाव 
 

‘सकाळ’ माध्यम समुहामुळे आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेती सिंचनासाठी पाणी साठवणुकीचा प्रश्न सुटण्यास भरीव मदत झाली आहे. त्यामुळे आम्ही वरखेडेकर दै. ‘सकाळ’च्या कायम ऋणात राहू.- निखिल कच्छवा, वरखेडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal relief fund campaign raises water storage capacity in varkhede