‘सकाळ रिलीफ फंड’मधून कुंझर झाले पाणीदार!

दीपक कच्छवा
सोमवार, 1 जुलै 2019

‘सकाळ रिलीफ फंड’मधून कुंझर (ता. चाळीसगाव) येथे करण्यात आलेल्या नाला खोलीकरणामुळे आज दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने सुमारे दोन कोटी लिटर पाणी साचले आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने समाजहिताच्या केलेल्या या कृतिशील कामाला निसर्गाची साथ लाभल्याने कुंझर परिसर जलमय झाला आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - ‘सकाळ रिलीफ फंड’मधून कुंझर (ता. चाळीसगाव) येथे करण्यात आलेल्या नाला खोलीकरणामुळे आज दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने सुमारे दोन कोटी लिटर पाणी साचले आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने समाजहिताच्या केलेल्या या कृतिशील कामाला निसर्गाची साथ लाभल्याने कुंझर परिसर जलमय झाला आहे. या पाण्यामुळे सुमारे पाचशे हेक्‍टर क्षेत्रदेखील ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आशा पल्लवित करण्यात ‘सकाळ’ने लावलेला हातभार सार्थकी ठरल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत.

‘सकाळ रिलीफ फंड’मधून व ‘तनिष्का’ सदस्यांच्या पुढाकाराने कुंझर (ता. चाळीसगाव) येथे नाला खोलीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले. आतापर्यंत या परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना दुष्काळाचा सामना करावा लागत होता. त्यासाठी गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर कशी होईल, यावर मार्गदर्शन केले. गावातील ग्रामस्थ व युवकांना एकत्र करून त्यांनी जलसंधारणाचे काम हाती घेतले. यासाठी ‘सकाळ’च्या ‘तनिष्का’ गटाच्या महिलांनी पुढाकार घेतला. ‘सकाळ माध्यम समूहा’कडे निधीची मागणी ‘तनिष्कां’नी केली. येथील पाणीटंचाई लक्षात घेता, ‘सकाळ रिलीफ फंड’मधून निधी मंजूर करण्यात आला व नाला खोलीकरणाचे काम लगेचच सुरू करण्यात आले.

‘सकाळ रिलीफ फंड’मधून कुंझर येथे ‘जेसीबी’च्या सहाय्याने छोट्या-छोट्या सात बंधाऱ्यांचे काम करण्यात आले आहे. तेथे जवळपास तीस हजार घनमीटर काम झाले आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थांनी एक लाख २५ हजार रुपये लोकवर्गणी जमा केली होती. 

कुंझरचे एकूण क्षेत्र दोन हजार ८७१ हेक्‍टर आहे. त्यापैकी पाचशे हेक्‍टर क्षेत्राला नाल्यातील जलसाठ्याचा फायदा होणार आहे. या कामासाठी गावातील रंजनाबाई सूर्यवंशी, राजेंद्र गोसावी, भागवत बैरागी, प्रशांत पाटील, राकेश गुरव, चंद्रशेखर शिसोदे, सचिन चौधरी, योगेश देवरे, भगवान सोनवणे, किशोर पाटील, गुलाब माळी, समाधान महाजन, अशोक महाजन, अनिता वाघ, कुलदीप पवार, छोटू राजपूत, वाल्मीक महाले, गोपाल बैरागी यांच्यासह ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले आहे.

जलसंधारणाच्या उत्कृष्ट कामकाजातून कुंझर येथे ‘जलक्रांती’स सुरवात झाली आहे. एकत्रित श्रमदानातून उभारलेली जलचळवळ तसेच कुंझरच्या ग्रामस्थांची कामगिरी प्रशंसनीय आहे.
- डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण (भारासे), आयकर उपायुक्त, मुंबई

‘सकाळ रिलीफ फंड’ आणि कुंझरच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या अपूर्व मेहनतीने गाव पाणीदार होत आहे. ‘तनिष्का’ गटातील सदस्यांनी पुढाकार घेऊन पुरुषांच्या बरोबरीने आपले योगदान दिले. त्यामुळे ही ‘जलक्रांती’ दिसत आहे.
- अंजू सोनवणे, सरपंच, कुंझर (ता. चाळीसगाव)

‘सकाळ माध्यम समूहा’कडून केले जाणारे सहकार्य कौतुकास्पद आहे. अडीच कोटी लिटरचा पाणीसाठा हा दीड तासात झाला. जर आज हे काम झाले नसते, तर सर्व पाणी वाहून गेले असते. या पाण्याचा विहिरीची पातळी वाढण्यात चांगली मदत होणार आहे. 
- प्रल्हाद सोनवणे, ग्रामस्थ, कुंझर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Relief Fund Kunjhar Village Water Storage