चैन-स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलिसांची 'ही' अनोखी शक्कल..

live photo
live photo

नाशिक : शहर हद्दीमध्ये ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात चैन स्नैचिंगचे प्रकार वाढल्याने पोलिसांसमोर सोनसाखळी चोरट्याचे आव्हान उभे राहिले आहे. महिलांमध्ये जनजागृती करूनही चैन-स्नॅचिंगच्या घटना घडतच आहेत. यावर, उपनगर पोलिसांनी फलकबाजीचा उपाय शोधून काढला आहे. उपनगर पोलिसांनी ठिकठिकाणी फलक लावले असून प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधून त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. 

२०० फलक ठिकठिकाणी लावून चोरट्यांपासून सावध राहण्याचा संदेश

ऐन दिवाळीत आणि त्यानंतरही शहर हद्दीमध्ये सोनसाखळी खेचण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. सोनसाखळी चोरट्यांच्या टोळ्या या शहरातील आहेत की परगावाच्या आहेत याचाही मागमूस अद्यापपर्यंत पोलिसांना लागू शकलेला नाही. परंतु सोनसाखळी खेचण्याच्या घटनेने महिलांमध्ये मात्र दहशतीचे, भितीचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून उपनगर पोलिसांनी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी यांनी २०० फलक ठिकठिकाणी लावून चोरट्यांपासून सावध राहण्याचा संदेश महिलांना दिला आहे.

मोहिमेत रिक्षाचाही वापर 

ज्या-ज्या ठिकाणी सोनसाखळी खेचण्याच्या घटना घडल्या आहेत, त्या-त्याठिकाणी हे फलक लावण्यात आले आहेत. त्यासाठी रिक्षाचाही वापर करण्यात येऊन रिक्षाच्या मागेही फलक लावण्यात आले आहेत. तसेच महिलांच्या वर्दळीच्या ठिकाणी, कॉलनी परिसर, महाविद्यालय, व्यापारी पेठांमध्ये हे फलक लावण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांकडून महिला-नागरिकांशी संवाद साधत त्यांना चोरट्यांपासून सावध राहण्याचे, चोरी झाल्यास पोलिसांशी संपर्क कसा साधावा, संशयास्पद व्यक्तींबाबत तक्रार कशी करावी याबाबत प्रबोधन केले जात आहे. 

चैन-स्नॅचर स्थानिक की परगावचे? 
म्हसरूळ, उपनगर, गंगापूर रोड या परिसरात सोनसाखळ्या खेचून नेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अद्यापपर्यत पोलिसांच्या हाती सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीची कोणतीही ठोस माहिती नाही. कल्याण, ठाणे, श्रीरामपूर या भागातील इराण्या टोळ्या सोनसाखळ्या खेचून नेण्यात तरबेज असले तरी गेल्या काही वर्षात दोन-तीन टोळ्या नाशिक पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत. त्यानंतर परगावचे चैन-स्नॅचर असण्याची शक्‍यता कमी असली तरी, स्थानिक चोरट्यांच्या टोळ्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. मात्र अद्याप ठोस माहिती नाही. नव्याने गुन्हेगार यात आल्याचाही संशय व्यक्त होतो आहे. शहरातील मोठ्या रस्त्यांऐवजी कॉलनी रस्त्यावर संशयित महिलांना लक्ष्य करीत आहेत. त्यावरून संशयित हे स्थानिक असण्याचीच शक्‍यता अधिक व्यक्त होते आहे. 

प्रतिक्रिया
सोनसाखळी खेचण्याच्या घटनांना आळा बसावा, महिलांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने होर्डिंग्स्‌ लावण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांकडूनही महिला-नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. महिलांनीही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. - भारतकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनगर पोलीस ठाणे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com