नाशिकमध्ये रात्रभर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन 

live photo
live photo

नाशिक : विधानसभा निवडणूक आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटना या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मंगळवारी (ता.15) रात्री पोलिसांना शहरात कोमिंबग ऑपरेशन राबविले. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी अचानक राबविलेल्या या ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील 135 सराईत गुन्हेगारांची तपासणी केली असता, 82 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरभर ठिकठिकाणी नाकाबंदी करीत 104 वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, सदरच्या कारवाईमध्ये सातपूर हद्दीत गावठी कट्ट्यासह एकाला अटक करण्यात आली आहे. 

ऑक्‍टोबर हिटप्रमाणेच, सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरणही चांगलेच तापले आहे. तर, पोलीस निवडणुकीच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याचा गैरफायदा गुन्हेगारांकडून घेतला जात असून सोनसाखळी चोऱ्या, घरफोड्यांचे प्रकारही वाढले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी अचानक शहर हद्दीमध्ये कोबिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मंगळवारी (ता.15) रात्री दहा वाजेपासून शहरभर गुन्हेगारांविरोधातील कोबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या झोपडपट्टांमध्ये फिरले. त्यावेळी त्यांनी काही गुन्हेगारांच्या कुटूंबियांसह, नागरिक, महिलांशीही संवाद साधला. 
नांदूरनाका, सिन्नर फाटा, म्हसरुळ गाव, राऊ हॉटेल परिसर, अंबड टी पॉईंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जहान सर्कल, नारायण बापू नगर, पाथर्डी फाटा, वडनेरगेट, भगूर नाका यासह शहरातील झोपडपट्टया परिसरामध्ये पोलिसांनी गुन्हेगारांचा कसून शोध घेतला. यात 135 पैकी 82 गुन्हेगारांवर कारवाई केली. तडीपार करण्यात आलेल्या 59 पैकी एकाला अटक केली. शहरातील 32 लॉजेस, हॉटेल्समध्ये तपासणी करण्यात आली. तर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 28 जणांवर ड्रंक ऍण्ड ड्राईव्हच्या केसेस करण्यात आल्या. आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करीत 350 वाहनांची तपासणी केली असता, 104 वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत 24 हजार 800 रुपये वसुल करण्यात आले. तसेच 104 टवाळखोरांविरोधातही कारवाई करण्यात आली. 
सदरच्या कारवाईमध्ये पोलीस आयुक्तांसह उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले-श्रींगी, विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, समीर शेख, प्रदीप जाधव, आर.आर. पाटील, अनिरुद्ध आढवा, इश्‍वर वसावे, मंगलसिंह सूर्यवंशी यांच्यासह 25 पोलीस निरीक्षक, 49 सहाय्यक निरीक्षक आणि 451 पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com