सातपूरमध्ये मद्यपीने धुमाकूळ घालत पोलिसाचा मोबाईल फोडला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांना धक्काबुक्की 

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांना धक्काबुक्की 

नाशिक : सातपूर येथे हॉटेलमध्ये दारू पिल्यानंतर त्याचे पैसे न देताच निघाला. त्यास हटकल्याने त्याने हॉटेलच्या व्यवस्थापकाला मारहाण केली. तसेच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशी वाद घातला. यावेळी पोलिसांनी मोबाईलमध्ये शुटिंग केले असता मद्यपी संशयिताने मोबाईल हिसकावून फोडला. तसेच, स्वत:चे डोके फोडून घेत पोलिसांना पाहून घेण्याची धमकी दिली. तर, दुसऱ्या घटनेत द्वारका चौकात नो-पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ट्रॅव्हलचालकाने वाहतूक पोलिसाशी वाद घातला. या दोन्ही प्रकरणी सातपूर व मुंबई नाका पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सातपूर औद्योगिक वसाहतीत शामसुंदर हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये गेल्या शनिवारी (ता.10) संशयित योगेश फुला हिरे (40) याने दारु पिला. त्यानंतर पैसे न देताच तो जाऊ लागला. त्यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक तफनकुमार शिवप्रसाद साव यांनी बिलाच्या पैशांची मागणी करताना, यापूर्वीही पैसे न देता गेल्याची विचारणा केली. त्याचा राग येऊन संशयित योगेश हिरे याने शिवीगाळ करीत मारहाण केली. व्यवस्थापकाच्या अंगावरील कपडे फाडून हॉटेलच्या गल्ल्यातून 500 रुपये बळजबरीने काढून घेत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या वादाची माहिती तात्काळ सातपूर पोलिसांना कळविण्यात आली असता, हवालदार सूर्यवंशी व जावेद खलील शेख हे घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलीस कर्मचारी शेख यांनी संशयिताला समजावून सांगत असतानाही त्याचा धुमाकुळ सुरूच होता. त्यावेळी हवालदार सूर्यंवंशी यांनी मोबाईलमध्ये संशयिताचे चित्रण केले असता, संशयित हिरे याने हवालदार सूर्यवंशी यांच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि जमिनीवर आपटून फोडला. तसेच, त्यानंतर संशयिताने स्वत:चे डोके फरशीवर आपटून घेतले आणि तुमची नोकरीच घालवितो असे म्हणून धमकीही दिली. याप्रकरणी सातपूर पोलिसात हॉटेलचे व्यवस्थापक तफनकुमार साव यांच्या फिर्यादीनुसार जबरी चोरी, मारहाणीचा गुन्हा तर, पोलीस जावेद शेख यांच्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक मजगर व उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत. 

वाहतूक पोलिसाची पकडली कॉलर 
वाहतूक पोलीस भूषण सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता.10) दुपारी तीन वाजेच्या सुमारास द्वारका सर्कल येथील पंजाब हॉटेलसमोर संशयित दत्ता किसन गायकवाड (41, रा. विजयनगर, औरंगाबाद नाका) याने ट्रॅव्हल बस नो-पार्किंगमध्ये पार्क केली. त्यावेळी वाहतूक पोलीस सूर्यवंशी यांनी नो-पार्किगमधून बस काढून घेण्यास सांगितले. त्याचा राग येऊन संशयित गायकवाड याने, तू मला ओळखत नाही. मी देवकर मॅडमचा नातेवाईक असून ही गाडी इथेच उभी राहील. असे म्हणून वाहतूक पोलीस सूर्यवंशी यांच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-drinker-police-crimenews