कांद्या व्यापाऱ्यास गंडविणाऱ्यास दिल्लीतून अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

गुन्हेशाखा युनिट एकची कामगिरी : दोन कोटींची केली होती फसवणूक 

नाशिक : लाखलगाव परिसरातील कांदा व्यापाऱ्यास दोन कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्यास दिल्लीतून अटक केली आहे. अली हुसैन मोहम्मद हुसेन (33, रा. दरियागंज, दिल्ली) असे संशयिताचे नाव असून गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्यास अटक केली आहे. याप्रकरणी गेल्या ऑगस्ट महिन्यात आडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 

गुन्हेशाखा युनिट एकची कामगिरी : दोन कोटींची केली होती फसवणूक 

नाशिक : लाखलगाव परिसरातील कांदा व्यापाऱ्यास दोन कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्यास दिल्लीतून अटक केली आहे. अली हुसैन मोहम्मद हुसेन (33, रा. दरियागंज, दिल्ली) असे संशयिताचे नाव असून गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्यास अटक केली आहे. याप्रकरणी गेल्या ऑगस्ट महिन्यात आडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 

आडगाव पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखेच्या युनिट एककडून सुरू असताना, कांदा व्यापाऱ्यास गंडा घालणारा संशयित दिल्लीत असल्याची खबर मिळाली होती. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार संजय मुळक, संतोष कोरडे, सचिन अजबे यांचे पथक गेल्या शनिवारी दिल्लीकडे रवाना झाले. रविवारी (ता.6) दुपारी सव्वा वाजता संशयित अली हुसैन यास अटक केली. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात हजर करून नाशिकमध्ये आणले आहे. संशयिताच्या चौकशीतून आणखीही व्यापाऱ्यांच्या फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 
मुनाफ अब्दुल रहेमान सौदागर (रा. लाखलगाव, ता.जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते कांद्याचे व्यापारी आहेत. संशयित अली हुसैन याने सईद के. वारसी असे खोटे नाव सांगून, दिल्लीतील के.एस. व्हेजिटेबल ऍण्ड फुड गुडगाव या कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे कांदा व्यापारी मुनाफ सौदागर यांना सांगितले होते. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून कांदा खरेदी केला. सुरुवातीला त्याने रोख व्यवहार करीत कांदा व्यापाऱ्याचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्याच विश्‍वासाने संशयिताने 19 डिसेंबर 2018 ते 4 एप्रिल 2019 यादरम्यान 42 ट्रक व 35 कंटेनरमधून 2 कोटी 50 लाख 61 हजार 778 रपयांचा कांदा खरेदी केला. सदरचा कांदा श्री. सौदागर यांनी संशयितावर विश्‍वास ठेवून जैद ओनियन एजन्सी, ओखला मंडी दिल्ली, राज ओनियन एजन्सी, सियालदा पश्‍चिम बंगाल या ठिकाणी पाठविला. त्याबदल्यात संशयिताने फक्त 50 लाख रुपये श्री.सौदागर यांना दिले. उर्वरित दोन कोटी रुपयांची रक्कम संशयिताने दिली नाही. त्यानंतर त्याचा संपर्कही होत नव्हता. अखेरिस फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गेल्या 26 ऑगस्ट रोजी आडगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-onion-crimenews