सणासुदीच्या गर्दीत वाहतूक पोलिसांच्या कारवाईने मनस्ताप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

वाहनचालकांमध्ये संताप : भीक नको पण कुत्रं आवर म्हणण्याची वेळ 

वाहनचालकांमध्ये संताप : भीक नको पण कुत्रं आवर म्हणण्याची वेळ 

नाशिक : सणासुदीच्या उत्सवाला प्रारंभ झालेला असताना शहरातील उपनगरीय बाजारपेठांमध्ये गर्दी आहे. आसपासच्या परिसरातूनच खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे. बऱ्याच ठिकाणी तर वाहनचालकांशी वादावादीनंतर पोलिसांकडून वाहनांचे क्रमांक घेत "येईल घरी नोटीस' असा दम दिल्याने अनेकांची "भीक नको पण कुत्रं आवर' अशी म्हणण्याची वेळ आली. दरम्यान, गेल्याच आठवड्यात पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेला ऐनसणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना त्रास होईल असे कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिलेले असताना वाहतूक शाखेकडूनच त्यांच्या या आदेशाला हरताळ फासला जातो आहे. 
.. 
पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये वाहतूक शाखेला ऐनसणासुदीमध्ये वयोवृद्ध, महिला, कुटूंबिय वाहनचालकांना नाहक त्रास न देता, गुन्हेगारी स्वरुपाच्याच वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही वाहतूक शाखेकडून घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला शहरातील उपनगरीय परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. 
उपनगरीय बाजारपेठांमध्ये नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी वाहनचालक आले होते. त्यातच बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवली होती. त्याकडे लक्ष न देता वाहतूक शाखेकडून मात्र अनेक ठिकाणी सायंकाळी नाकाबंदी केली गेली. यावेळी बाजारातून घराकडे परतणाऱ्यांना वाहतूक शाखेच्या पथकाकडून रोखण्यात येऊन हेल्मेट नसणे, कागदपत्रे नसणे यासारख्या कारणांवरून दंडाची कारवाई सुरू केली गेली. यात ा काही वाहनचालकांनी, बाजारात गेल्याचे कारण देत हेल्मेट सांभाळायचे की बाजार करायचा असे कारण दिले. तर काहींनी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावरच घर असताना हेल्मेट न आणल्याचे कारण दिले. काहींनी तर बाजारपेठेतून आणलेल्या बाजाराच्या पिशव्या दाखवित, आम्ही गुन्हेगार आहोत का असा थेट सवालही त्यांच्यासमोर उपस्थित केला. परंतु वाहतूक पोलीस काही केल्या ऐकत नसल्याचे अनेकदा वादावादीचे प्रसंग झडले. 

भीक नको पण कुत्रं आवर 
वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांतील वादावादीचे प्रसंग होत असताना काही वाहनचालकांनी दंड न भरता निघून जाणे पसंत केले. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी त्या वाहनचालकांच्या दुचाकींचा क्रमांक घेत, जा आता तुमच्या घरीच येईल नोटीस. मग व्हा कोर्टापुढे हजर, असा दमही भरला. त्यामुळे मात्र काही वाहनचालकांची "भीक नको पण कुत्रं आवर' असंच म्हणण्याची वेळ आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-traffic-news