एटीएम मशिनच पळविणारे दरोडेखोर जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

शहरात पहाटेच्या सुमारास थरार : पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग 

शहरात पहाटेच्या सुमारास थरार : पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग 

नाशिक : सातपूर परिसरातील खोडे पार्क येथील आयसीआयसीआय बॅंकेचे एटीएम मशिनच बोलेरो चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांच्या गस्तीपथकामुळे सदरचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला खबर दिल्यानंतर सुमारे अर्धा ते पाऊण तास दरोडेखोरांच्या वाहनाला अटकाव करण्यासाठी शहरात आज पहाटेच्या सुमारास सिनेस्टाईल चोर-पोलिसांचे थरारनाट्य रंगले. जागोजागी नाकाबंदी करीत बोलेरोला अखेर हिरावाडीत पोलिसांनी रोखले. यात दोघांना अटक केली असून पाच ते सहा संशयितांनी वाघाडी नदीतून पोबारा केला आहे. दरोडेखोर हे धुळ्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहेत. 

मिलनसिंग रामसिंग भादा (रा. मोहाडी, जि. धुळे), गजानन मोतीराम कोळी (रा. मोहाडी, जि. धुळे) अशी जेरबंद करण्यात आलेल्या दोघा दरोडेखोरांची नावे असून त्यांच्यावर 7 ते 8 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. 
सातपूर-त्र्यंबकरोडवरील खोडे पार्क येथे आयसीआयसीआय बॅंकेचे एटीएम असून याठिकाणी पोलिसांनी क्‍युआर कोड लावले आहे. सातपूर पोलिस ठाण्याचे रात्रगस्ती पथकाचे (बीटमार्शल) शरद झोले व दीपक धोंगडे हे दोघे आज (ता.24) पहाटे 4.20 वाजता क्‍युआर कोड स्कॅनिंगसाठी त्याठिकाणी आले असता, त्यांना बोलेरो चारचाकी वाहनाजवळ काही संशयित चेहरा झाकलेले संशयित दिसले. सहा संशयितांनी एटीएम मशिनच उचलून बोलेरोत टाकण्याचा प्रयत्न करीत होते. दोघा बीटमार्शलने त्यांना हटकले असता, एटीएम मशिन तिथेच टाकून संशयित बोलेरो दोघांच्या अंगावर घातली. तर एकाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वारही केला. मात्र त्यांनी तो चुकविला. संशयित भरधाव वेगात नाशिकच्या दिशेने निघाले. तोपर्यंत बिटमार्शलने नियंत्रण कक्षाला खबर दिली. 
त्याचवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह रात्रपाळीच्या गस्तीवर असलेले पंचवटी, सातपूर, सरकारवाडा, मुंबई नाका, भद्रकाली, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या सुमारे 24 वाहनांनी मिळालेल्या संदेशानुसार तात्काळ नाकाबंदी केली. तर सरकारवाडा, सातपूर आणि गुन्हेशाखेच्या पथकाच्या वाहनाने दरोडेखोरांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. संशयित दरोडेखोर चांडक सर्कल, मुंबईनाका मार्गे द्वारका सर्कलवरून उड्डाणपुलावरून के.के. वाघ कॉलेजसमोर खाली उतरले. मात्र त्याचवेळी समोर पंचवटी, आडगावचे पोलीस वाहने दबा धरून असल्याने संशयितांनी यु-टर्न घेतले आणि पाठलाग करणाऱ्या वाहनांला कट मारून ते हिरावाडीत शिरले. त्याही ठिकाणी नाकाबंदी करीत पोलीस वाहने पाहून संशयिताने वाहन कॉलनी रस्त्याने घातली आणि एका भिंतीजवळ त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने ते भिंतीवर जाऊन धडकले. त्याठिकाणी अंधार असल्याने दोघांना पोलिसांनी जागीच जेरबंद केले तर पाच ते सहा संशयितांनी अंधाराचा फायदा घेत वाघाडी नदीच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी नागरिक लियाकत शेख यानेही पोलिसांना मदत केली. पोलिसांनी डॉगस्कॉडच्या मदतीने पहाटे सात वाजेपर्यंत संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मोखाड्यात ज्वेलरी शॉप फोडले 
संशयित दरोडेखोरांनी पारोळ्यातून (जि. जळगाव) बोलेरो वाहन चोरले. त्यानंतर ते मोखाडा (जि. पालघर) येथे मध्यरात्रीच्या सुमारास अथर्व ज्वेलर्स दुकानात घरफोडी करीत सुमारे 50 हजार रुपयांचे दागदागिने चोरून सातपूरमध्ये आले होते. पहाटे चारच्या सुमारास संशयितांनी एक सीसीटीव्ही फोडला. सायकलचे टायरला दोरखंड बांधून त्यांनी बोलेरोच्या सहाय्याने एटीएम मशिन उखडले आणि 6 लाख रुपये असलेले एटीएम पळविण्याचा प्रयत्न मात्र बीटमार्शलमुळे फसला. 

बीटमार्शल्सला प्रत्येकी 25 हजार रुपयांचा रिवॉर्ड 
सातपूर पोलिस ठाण्याचे बीटमार्शल शरद झोले आणि दीपक धोंगडे यांनी धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांना सामना केला आणि त्यानंतर तात्काळ घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यामुळे धुळ्याची दरोडेखोरांची टोळी जेरबंद झाली. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी बीटमार्शलला प्रत्येकी 25 हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला. यावेळी उपायुक्‍त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले, विजय खरात यांच्यासह सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक उपस्थित होते. दरम्यान, बिटमार्शलची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांना हत्यार (पिस्तुल) देण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले. मात्र तत्पूर्वी अशा पोलीस कर्मचाऱ्यांची मानसिकताही तपासली जाणार आहे. 

24 वाहनांनी केला पाठलाग 
नियंत्रण कक्षातून खबर मिळताच पंचवटीचे पोलीस निरीक्षक के. डी. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चोपडे, हवालदार जी. जे. पोटिंदे, योगेश सस्कर, अरुण हाडस, पवार, नरोडे यांच्या पथकाने मालेगाव, पेठ, दिंडोरी, पंचवटीकडे जाणारे मार्ग रोखले. सातपूर, सरकारवाडा, मुंबई नाका, भद्रकालीच्या पोलिसांनी नाकाबंदी करीत बोलेरोचा पाठलाग सुरू केला. नाशिकरोड, आडगाव पोलिसांनीही नाकाबंदी केली. सुमारे अर्धा-पाऊणतास 24 वाहने संशयितांचा पाठलाग करीत होते. 
 
दरोडेखोर हे धुळे जिल्ह्यातील असून सराईत गुन्हेगार आहेत. पसार झालेल्यांना लवकरच अटक केली जाईल आणि मोक्काअन्वये त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikATMrobberycrimenews