वीजतारांच्या धक्‍क्‍याने सिडकोत सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई 

सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई 

नाशिक : सिडकोतील शिवपुरी चौकामध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यासमोरच उच्च वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून सासू-सुनेचा जागीच मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी संतप्त जमावाने जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर रास्तारोको आंदोलन करीत मदतीची मागणी केली. पोलीस, जिल्हा रुग्णालय यांच्या समन्वयातून आंदोलनकर्ते आणि मृतांच्या नातलगांना विश्‍वास घेऊन जखमींना तात्काळ सर्वतोत्तम औषधोपचारासाठी आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून आपत्तीजनक घटनेप्रकरणी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, संबंधित घरमालकास वीज वितरण कंपनीने गेल्या जानेवारी महिन्यातच नोटीस बजाविल्याचेही समोर आले आहे. यानिमित्ताने पुन्हा सिडकोतील धोकादायक वीजतारांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

या दुर्दैवी घटनेमध्ये सोजाबाई आणि सिंधूबाई केदारे या सासू-सुना जागीच गतप्राण झाल्या, तर नंदिनी व शुभम ही भावंडे गंभीररित्या भाजले आहेत. सिडकोतील उत्तमनगर परिसरात शिवपुरी चौकात शांताराम केदारे यांची दुमजली इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या टेरेसपासून अवघ्या काही फुटांवरील वीज वितरण कंपनीची उच्चदाबाची वीजवाहिनीचा पोल आहे. आज (ता.29) सकाळी पावणे-दहा वाजेच्या सुमारास सोजाबाई केदारे (80) या कपडे वाळत टाकण्यासाठी आल्या असता, त्यांना वीजवाहिनीच्या तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांची सून सिंधूबाई केदारे (40) या धावल्या असता, त्यांनाही विजेचा धक्का बसला. ही बाब सिंधूबाई यांची मुलगी नंदिनी उर्फ राणी (23) हिच्या लक्षात येताच तीही मदतीसाठी आली परंतु दोघांना विजेचा धक्का बसलेला असल्याचे तिच्या लक्षात आले होते. मात्र त्याचवेळी सासू-सूनाच्या शरीरातील विजेचा प्रवाह तेथील लोंखंडी ग्रीलमध्ये उतरला आणि त्याचा धक्का नंदिनीला बसला. शुभमही मदतीला धावला मात्र त्यासही त्याठिकाणी उतरल्या विजप्रवाहाचा धक्का बसला. अवघ्या क्षणांमध्ये चौघांना विजेचा धक्का बसला. 
या दुर्दैवी घटनेमध्ये सोजाबाई आणि सिंधूबाई केदारे या सासू-सुना जागीच गतप्राण झाल्या, तर नंदिनी व शुभम ही भावंडे गंभीररित्या भाजले आहेत. जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. गायधनी यांनी तात्काळ जखमींना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले. यात नंदिनी हिचे दोन्ही हात आणि पाय गंभीर भाजले असून यात ती सुमारे 65 टक्के भाजली आहे. तर, शुभमचे दोन्ही पाय भाजले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, अंबडचे पोलीस निरीक्षक श्रीकांत परोपकारी घटनास्थळी दाखल झाले. 

सिव्हिलसमोर रास्तारोको 
जखमी नंदिनी व शुभम यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचार करण्याच्या मागणीसाठी दीपक डोके, प्रशांत खरात यांच्यासह जखमींच्या नातलगांनी जिल्हा रुग्णालयासमोर रास्तारोको आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी हे घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी, जखमींवर प्राथमिक उपचार महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर आंदोलक जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची मागणी करीत होते. त्यावर समन्वयातून आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात येऊन दोघांना हलविण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी नातलगांची भेट घेऊन जखमींच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत सूचना केल्या. 
 
वीजकंपनीकडून यापूर्वीच नोटीस 
सिडकोतील अतिक्रमीत घरे आणि धोकादायक वीजतारांचा प्रश्‍न कायमाचा आहे. शांताराम केदारे यांना गेल्या 12 जानेवारी 2019 रोजी वीज कंपनीने विजेच्या खांबापासून घराचे बांधकाम करण्यात आलेले असून ते धोकादायक आहे. त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना कंपनीला देण्यात आलेली नाही वा, त्यामुळे कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्यास त्यास वीज कंपनी जबाबदार राहणार नाही, अशा आशयाची नोटीस बजाविलेली आहे. त्याकडे दूर्लक्ष करणे आज केदारे कुटूंबियांच्या जीवावर बेतले आहे. 
 
सिडकोत घडलेली दूर्घटना दुर्दैवी आहे. दोघांचा जीव गेला आणि तर दोघे जखमी आहेत. जखमींना वाचविण्याचे आव्हान आहे. त्यासाठी सर्वतोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त. 

उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या धक्‍क्‍यामुळे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, जिल्हा रुग्णालयास उपचार सुरू आहेत. नातलगांच्या मागणीनुसार त्यांना आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात येत आहे. 
- डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcidco-msebshockecrimenews