आदिवासी तालुक्‍यांमध्येही दर्जात्मक वैद्यकीय सेवा 

Residential photo
Residential photo

आदिवासी रुग्णांना दिलासा : स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची केली नियुक्ती 

नाशिक : आदिवासी भागात सरकारी वैद्यकीय सेवा देण्यास अनुत्सुकता असलेल्या तज्ज्ञ डॉक्‍टरांना चांगल्या वेतनाची हमी दिल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्‍यात तज्ज्ञ डॉक्‍टरांची कंत्राटी स्वरुपात नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी, वैद्यकीय सेवेसाठी लांबचे अंतर पार करून नाशिकला येणाऱ्या आदिवासी रुग्णांना तालुक्‍याच्याच सरकारी रुग्णालयात चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणार आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही 88 बीएएमएच डॉक्‍टरांची नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

नाशिक जिल्ह्याती आदिवासी तालुके अधिक आहेत. मात्र तेथील सरकारी रुग्णालयांमध्ये बालरोग, स्त्रीरोग, फिजीशियन यासारखे स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची कमतरता होती. त्यामुळे त्या तालुक्‍यांतील गर्भवती माता, रुग्ण मुलांना नाशिकच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत होती. यादरम्यान, रुग्णांच्या जीवावरही बेतले जात होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून सातत्याने आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून स्पेशालिस्ट डॉक्‍टरांच्या नियुक्ती करताना त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत नुकत्याच 36 स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या या स्पेशालिस्ट डॉक्‍टरांना चांगले मानधनही देण्यात आले आहे. 
विशेषत: जिल्ह्यातील आदिवासी तालुक्‍यांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञांची गरज होती. नवीन नियुक्तीमध्ये 7 स्त्रीरोगतज्ज्ञ व 5 बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती आहे. याशिवाय 13 एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्पेशालिस्ट डॉक्‍टरांमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

आरोग्य केंद्रावर बीएएमएस 
एनएचआरएमअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर बीएएमएस डॉक्‍टरांची कंत्राटी पद्‌धतीने घेण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र तोडक्‍या मानधनामुळे बीएएमएस डॉक्‍टरही सरकारी वैद्यकीय सेवेकडे पाठ करून होते. परंतु त्यांच्याही मानधनात मोठी वाढ केल्यामुळे अखेरीस 88 बीएएमएस डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्यापही सुमारे 300 जागा रिक्त असून त्याही लवकरच भरल्या जातील अशा विश्‍वास जिल्हा आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. 

स्पेशालिस्ट डॉक्‍टरांना त्यांच्या पसंतीनुसार कामाच्या ठिकाणाची संधी दिली आहे. त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद लाभला असून यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. शिवाय नाशिककडे येण्याचा जो रुग्णांचा ओढा आहे तो कमी होऊ शकेल. आदिवासी रुग्णांना त्याच तालुक्‍यात दर्जात्मक वैद्यकीय सेवा मिळणार आहे. 
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com