जिल्हा रुग्णालयातर्फे 26 पासून महाआरोग्य शिबिर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नाशिक : "संकल्प निरोगी महाराष्ट्राचा' या अभियानांतर्गत नाशिक जिल्हा रुग्णालयामार्फत येत्या सोमवारपासून (ता.26) मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणीसह शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. राज्यातील 16 जिल्हा रुग्णालयांमध्ये सदरचे महाआरोग्य शिबिर होत असून यात नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे. 

नाशिक : "संकल्प निरोगी महाराष्ट्राचा' या अभियानांतर्गत नाशिक जिल्हा रुग्णालयामार्फत येत्या सोमवारपासून (ता.26) मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणीसह शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. राज्यातील 16 जिल्हा रुग्णालयांमध्ये सदरचे महाआरोग्य शिबिर होत असून यात नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये महाआरोग्य शिबिरासंदर्भातील माहिती दिली. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील आदिवासी बहुल 16 जिल्ह्यांमध्ये मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिर येत्या 26 ते 29 तारखेदरम्यान होणार आहे. सदरचे शिबिर नाशिक जिल्हा रुग्णालयात आवारात होणार असून विविध क्षेत्रातील शहरातील तज्ज्ञ डॉक्‍टर्स शिबिरात सहभागी होणार आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर गेल्या आठवडाभरापासून रुग्णांची तपासणी सुरू आहे. यातील गंभीर रुग्णांना महाआरोग्य शिबिरात दाखल करण्यात येऊन त्यांच्या मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे. 

तंबाखूजन्य पदार्थांमुळे तरुण वर्गात मुखरोग बळावले आहेत. त्यातून मुखाचा कर्करोग असा जीवघेणा आजार जडण्याची शक्‍यता असते. त्यामुळे महाआरोग्य शिबिरात दंत व मुखरोगांचीही तपासणी केली जाणार आहे. यातून असाध्य आजार बळावण्यापूर्वीच त्यावर उपचार करणे शक्‍य होणार आहे. तमुळेच दंत-मुख तपासणीचा समावेश महाआरोग्य शिबिरात करण्यात आला आहे. 
 
असे असेल महाआरोग्य शिबिर 
* सोमवारी (ता.26) रुग्णांची नावनोंदणी व आरोग्य तपासणी 
* यासाठी सिव्हिलच्या आवारात तालुकानिहाय रुग्णांची तपासणी व्यवस्था 
* शहरातील स्पेशालिस्ट 80 डॉक्‍टर्सचा महाशिबिरात सहभाग 
* तात्काळ निदान झाल्यास सिव्हिलमध्ये शस्त्रक्रिया 
* प्लॅन सर्जरी असल्यास शासनामार्फत मोफत शस्त्रक्रिया 
* तालुकास्तरावर नावनोंदणी सुरू 
* औषधांचा साठा उपलब्ध 
* औषध वितरण व्यवस्थेसाठी 10 स्टॉल्स 
* जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय, ग्रामीण-उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मासिस्ट आशा कर्मचाऱ्यांचा सहभाग 

जिल्हा रुग्णालय, महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या महाआरोग्य शिबिरात रुग्णांची आरोग्य तपासणी करून उपचार केले जातील. वेळप्रसंगी मोफत योजनेंतर्गत शस्त्रक्रियाही केल्या जातील. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर्स उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे शहर-जिल्ह्यातील रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आहे. 
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcivilhospitalshibir