सराईत गुंडाच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

सत्र न्यायालयाचा अवघ्या दहा महिन्यात निकाल 

नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून गेल्या नोव्हेंबर 2018 मध्ये एम.जी. रोडवर दोघा आरोपींनी सराईत गुंड मनिष रेवर याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत निर्घृण खून केला होता. याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 22 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री साडेनऊ-पावणे दहा वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली होती. सदरील खटल्याचा अवघ्या दहा महिन्यात निकाल लागला आहे. 

सत्र न्यायालयाचा अवघ्या दहा महिन्यात निकाल 

नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून गेल्या नोव्हेंबर 2018 मध्ये एम.जी. रोडवर दोघा आरोपींनी सराईत गुंड मनिष रेवर याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत निर्घृण खून केला होता. याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 22 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री साडेनऊ-पावणे दहा वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली होती. सदरील खटल्याचा अवघ्या दहा महिन्यात निकाल लागला आहे. 

चेतन पोपट लेवे (20, रा. लक्ष्मी रो-हाऊस, आरटीओ ऑफिसजवळ, कर्णनगर, नाशिक), सिद्धेश राजू इस्ते (20, रा. आरटीओ ऑफिसजवळ, कर्णनगर, नाशिक) असे दोघा आरोपींची नावे असून दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. सराईत गुंड मनिष रेवर याने आरोपी चेतन लेवे यास एक-दीड वर्षापूर्वी मारहाण केली होती. त्याचा राग चेतन लेवे याच्या मनात होता. 22 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री मनिष रेवर हा घनकर गल्लीतून व्यायाम करून एम.जी.रोडवरील पानाच्या दुकानाजवळ मित्रांसोबत थांबला होता. त्यावेळी आरोपी चेतन लेवे, सिद्धेश इस्ते आणि एकजण असे थांबले होते. चेतन लेवे आणि मनिष रेवर हे दोघे बोलत बोलत श्‍याम सिल्क साडीच्या दुकानाशेजारील बोळीत गेले. त्याठिकाणी दोघा आरोपींनी जुन्या भांडणाच्या कुरापतीतून चॉपर, कोयता, चाकू अशा धारदार हत्त्यारांनी मनिष रेवर याच्यावर वार केले. यात मोठा रक्तस्त्राव झाल्याने मनिष रेवर यास जिल्हा रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी तपास करीत जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 
सदरच्या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायधीश एन.जी. गिमेकर यांच्यासमोर चालले. सरकारी पक्षातर्फे ऍड. रवींद्र निकम यांनी कामकाज पाहताना प्रत्यक्ष साक्षीदार, पंच, तपासी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली. यात आरोपींविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने न्या. गिमेकर यांनी दोघे आरोपी चेतन लेवे व सिद्धेश इस्ते यांना जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपये दंड; दंड न भरल्यास 1 वर्षांचा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार आर. आर. जाधव यांनी पाठपुरावा केला. आरोपी चेतन लेवे यास 2017 मध्ये दुचाकी चोरीच्या खटल्यातही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

10 महिन्यात निकाल 
नोव्हेंबर 2018 मध्ये सदरील खुनाचा गुन्हा घडला होता. याप्रकरणी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी जलद गतीने तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. तसेच, न्यायालयातही तातडीने सुनावणी होऊन अवघ्या 10 महिन्यांमध्ये खटल्यांतील आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. अलिकडच्या काळातील जलदरितीने शिक्षा ठोठावल्याची घटना म्हणता येईल. 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. तपास अधिकाऱ्यांनीही जलतगतीने आरोपपत्र सादर केल्याने खटला न्यायालयाच्या पटलावर आला. त्यानुसार, सुनावणी होऊन आरोपींविरोधातील ठोस पुरावे न्यायालयासमोर ठेवले. परिणामी, आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 
- ऍड. रवींद्र निकम, सरकारी वकील. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/court/judgement/life/crimenews