कामटवाड्यात टोळक्‍याचा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला 

Residential photo
Residential photo

नाशिक : कामटवाडा रस्त्यावरील धन्वंतरी कॉलेज समोरच आठ-दहा जणांच्या टोळक्‍याने दाम्पत्यावर जुनी कुरापत काढून हल्ला चढविला. टोळक्‍यातील संशयितांनी हातात तलवारी घेऊन धुडगूस घालत दोघांवर वार केले. याप्रकरणी अंबड पोलिसात परस्परविरोधी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेवेळी अंबड पोलिसांना खबर दिल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. अखेरीत जमलेल्या नागरिकांनीच जखमी दाम्पत्याला खासगी रुग्णालयात हलविले. 

दर्शन दोंदे, श्‍याम दोंदे, उत्तम दोंदे, पिंटू दोंदे (सर्व रा. कामटवाडा), रोशन जाधव (रा. पाटीलनगर, सिडको), प्रतिक अडांगळे (रा. ज्वारी कॉम्प्लेक्‍स, अभियंतानगर) यांच्यास तीन-चार साथीदारांविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघा दीपक मगर (रा. समता चौक, अभियंता नगर, कामटवाडा, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी (ता.21) रात्री दहा वाजेच्या सुमारास मगर दाम्पत्य कामटवाडा राजवाड्यासमोरील धन्वंतरी कॉलेजसमोरील मोकळ्या पटांगणात होते. त्यावेळी संशयित दर्शन दोंदे याने दीपक मगर यांच्याशी कुरापत काढून वाद घातला. त्यानंतर त्याने त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण सुरू केली. तसेच, अन्य संशयितांना जमा करीत त्याने दाम्पत्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याचवेळी दर्शन दोंदे याने त्याच्याकडील धारदार तलवारीने मगर दाम्पत्यांवर वार करून गंभीर जखमी करीत घटनास्थळावरून पोबारा केला. 
उत्तम संजू दोंदे (रा. कामटवाडा राजवाडा) याच्या फिर्यादीनुसार, संशयित विनोद मगर, अजय परदेशी, दीपक मगर, अविनाश झुंबड, प्रवीण भगत, राहुल साळुंखे व तीनचार साथीदार यांनी दर्शन दोंदे कोठे आहे याची विचारणा केली. त्यावेळी उत्तम दोंदे यांनी माहीत नसल्याचे सांगितल्याने त्याचा राग येऊन संशयितांनी हॉकी स्टीकने मारहाण करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याप्रकरणी अंबड पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक बेडवाल करीत आहेत. 
 
अंबड पोलीसांनी केले दूर्लक्ष 
सदरची हाणामारीचा प्रकार सुरू असताना काही जागरूक नागरिकांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्याला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. परंतु बऱ्याच वेळ होऊनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. आठ-दहा युवक हातांमध्ये तलवारी घेऊन धुडगुस घालत भर चौकात दहशत पसरविली. पोलीस तर नाहीच परंतु गस्तीपथकही आले नाही. अंबड पोलीसांकडून नागरिकांच्या कोणत्याही तक्रारींना दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाही वरिष्ठ पातळीवरून कोणतीही कारवाई होत नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे. अंबड हद्दीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी बोकाळली असून आता भररस्त्यावर हत्यारे उपसले जात असून कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडविली जाते आहे, याची पोलीस आयुक्‍तांनी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com