तपोवनात सिनेस्टाईल पाठलाग करीत बासष्ट किलो गांजासह स्विफ्ट जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नाशिक ग्रामीणचा पोलीसाचा संबंध : तिघांना अटक 

नाशिक/म्हसरूळ : शहरात स्विफ्ट गाडीतून गांजा आणणाऱ्या तीन संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकने तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ सिनेस्टाईल पाठलाग करीत जेरबंद केले. संशयितांकडून स्विफ्टसह 62 किलो गांजा, असा 10 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हेशाखेने तिघांना अटक केली आहे. तर याप्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीसही संशयित असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

नाशिक ग्रामीणचा पोलीसाचा संबंध : तिघांना अटक 

नाशिक/म्हसरूळ : शहरात स्विफ्ट गाडीतून गांजा आणणाऱ्या तीन संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकने तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ सिनेस्टाईल पाठलाग करीत जेरबंद केले. संशयितांकडून स्विफ्टसह 62 किलो गांजा, असा 10 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हेशाखेने तिघांना अटक केली आहे. तर याप्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीसही संशयित असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस उपनिरीक्षक बलराम पालकर यांना आज (ता.10) दुपारी शहरात कारमधून मोठ्याप्रमाणात गांजा येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, गुन्हेशाखेचे उपायुक्‍त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक पालकर यांच्या पथकाने औरंगाबाद रोडवरील मिर्ची सिग्नल येथे सापळा रचला होता. दुपारी एक वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्विप्ट कार (एमएच 12 एफयु 4020) नाशिकच्या दिशेने येत असताना पोलिसांनी रोखण्याचा इशारा केला. परंतु कारचालकाने कार वेगात तपोवनाच्या दिशेने पळविली. त्यावेळी पोलीस वाहनांनी कारचा सिनेस्टाईल पाठलाग करीत तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ कार अडविली. कारमधील तिघांनी वाहन सोडून पळण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तिघे संशयित धनराज पवार (32, रा. राजीव गांधीनगर, निफाड), युवराज मोहिते (50, रा. गंगोत्री विहार, अमृतधाम, पंचवटी), प्रशांत नारळे (35, रा. कुमावतनगर, पंचवटी) यांना अटक केली. कारची झडती घेतली असता, 5 लाख 16 हजार रुपयांचा 62 किलो गांजा, 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल आणि 5 लाखांची कार असा 10 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, सहाय्यक उपनिरीक्षक कारवाळ, संजय मुळक, वसंत पांडव, दिघोळे, येवाजी महाले, बागूल, शांताराम महाले, गणेश वडजे, विशाल काठे, दीपक मोंढे, पोखरकर यांनी बजावली. 

ग्रामीण पोलीस भाबडचा शोध सुरू 
नाशिक ग्रामीणचा पोलीस कर्मचारी जयेश भाबड (रा. जेलरोड) व गोटू उर्फ अमर बोरसे (रा. तारवालानगर, पंचवटी) यांनीच सदरील गांजा चॉंदशी शिवारातील हॉटेलच्या खोलीतून संशयितांच्या ताब्यात दिला. सदरचा गांजा भाबड व बोरसे यांचा असल्याचे संशयितांनी कबुली दिली असून शहर पोलीस दोघांचा कसून शोध घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews