224 गुंडांना आयुक्तालय हद्दीमध्ये राहण्यास मनाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

नाशिक : विधानसभा निवडणुकीचा ज्वर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मतदान व मतमोजणी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील 224 सराईत गुन्हेगारांना या काळात शहरात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यात आला आहे. मनाई आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 तारखेला मतदान तर 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अमोल तांबे यांनी पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबई नाका, गंगापूर, सरकारवाडा या पोलीस ठाण्याच्या हददीतील 224 गुंडांना उद्या (ता.19) सायंकाळी 5 वाजेपासून येत्या सोमवारी (ता.21) दुपारी 2 वाजेपर्यंत; तसेच मतमोजणीच्या 24 तारखेला सकाळी 7 ते मध्यरात्री 24 वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच आदेशच बजाविण्यात आले आहे. या आदेशाचा भंग केल्यास मात्र कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 
या 224 गुंडांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये शरीराविरुद्ध, मालाविरुद्ध, दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हे, गुन्हेगारी कारवाया अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या संशयितांकडून मतदान प्रक्रिया व मतमोजणीदरम्यान बाधा पोहोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांना मनाई आदेश बजाविण्यात आले आहे. मात्र, मनाई आदेश असला तरी त्यांना आपला मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. 

पंचवटी पोलीस ठाणे - 25,

आडगाव पोलीस ठाणे - 14,

म्हसरुळ पोलीस ठाणे - 32,

भद्रकाली पोलीस ठाणे - 46,

मुंबई नाका - 31,

गंगापूर पोलीस ठाणे - 48,

सरकारवाडा पोलीस ठाणे - 28 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews