चोरट्यांनी लुटले 23 दिवसात सात लाखांचे सोने 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

ऐनसणासुदीमध्ये पोलिसांसमोर आव्हान : वाढविलेल्या गस्ती कुचकामी 

ऐनसणासुदीमध्ये पोलिसांसमोर आव्हान : वाढविलेल्या गस्ती कुचकामी 

नाशिक : मुंबई नाका परिसरात चार दिवसांपूर्वीच महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपयांची सोनसाखळी खेचून नेल्याची घटना घडलेली असताना, पुन्हा पादचारी महिलेच्या सोन्याच्या मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेले. दरम्यान, गेल्या 23 दिवसांमध्ये शहरात चैनस्नॅचिंगच्या 7 घटनांमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज खेचून नेला तर, तीन घटनांमध्ये 3 लाख 42 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. ऐनसणासुदी तोंडावर वाढलेल्या या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान उभे राहिले असले तरी पोलीस आयुक्तांच्या सूचनानुसार वाढविण्यात आलेली पोलीस गस्ती कुचकामी ठरल्यात की काय, असा प्रश्‍न उभा राहतो आहे. 

गोविंदनगर परिसरातून भाजीपाला खरेदी करून घराकडे जाणाऱ्या पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र संशयितांनी खेचून नेल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. ज्योती सुहास सोनवणे (रा. अमृतवेल पार्क, सर्कल हॉस्पिटलजवळ, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या शनिवारी (ता.21) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गोविंदनगर परिसरातून भाजीपाला खरेदी करून घराकडे पायीच जात होत्या. त्यावेळी गोविंदनगरमधील एका बंगल्यासमोरच्या लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून नेले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या 18 तारखेला पादचारी महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याचा प्रकार घडला आहे. 

सोनसाखळी चोरट्यांनी पोलीस गस्त ठरविली कुचकामी 
पूर्वीच्या तुलनेत दिवस-रात्र पोलीस गस्त वाढविण्यात आली. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या सूचनेनुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात 200 क्‍युआर कोड लावण्यात येऊन गस्तीपथके (डीबी) वाढविली. त्यासाठी वाहनांची संख्याही वाढविली. असे असतानाही गेल्या 23 दिवसांमध्ये 7 गुन्ह्यात सोनसाखळी चोरट्यांनी 3 लाख 65 हजार रुपयांच्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले आहे. तर बसप्रवासादरम्यान दोन घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. तर, नाशिकरोड येथे बॅंकेसमोरच पार्क केलेल्या ऍक्‍टिव्हाच्या डिक्‍कीतून तब्बल 2 लाख 82 हजार 900 रुपयांचा सोन्याचे दागिने चोरीला गेले. त्यामुळे चोरट्यांनीच "स्मार्ट' पोलिसांची "स्मार्ट' गस्त फोल ठरविल्याचेच सिद्ध झाले असून, येत्या सणासुदीच्या काळात पोलिसांच्या सोनसाखळी चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

23 दिवसांतील चैनस्नॅचिंग : 
पोलीस ठाणे        चैनस्नॅचिंग                   ऐवजाची रक्कम 
सातपूर              2 सप्टेंबर                      50,000 रु. 
इंदिरानगर         2 सप्टेंबर                      30,000 रु. 
इंदिरानगर          7 सप्टेंबर                     30,000 रु. 
इंदिरानगर        17 सप्टेंबर                  1,35,000 रु. 
म्हसरुळ           10 सप्टेंबर                     20,000 रु. 
मुंबई नाका        18 सप्टेंबर                     70,000 रु. 
मुंबई नाका        21 सप्टेंबर                    30,000 रु. 
एकूण : 3,65,000 रु. 

प्रवास/दुचाकीच्या डिक्कीतून सोन्याचा ऐवज चोरी :
नाशिकरोड        16 सप्टेंबर                    20,000 रु. 
नाशिकरोड        17 सप्टेंबर                    40,000 रु. 
उपनगर            20 सप्टेंबर                 2,82,900 रु. 
एकूण : 3,42,900 रु. 
* एकूण : 7 लाख 7 हजार 900 रुपये. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenewschainsnatching