सोनसाखळी चोरट्यांची टोळी जेरबंद 

live photo
live photo

दहा गुन्ह्यांची उकल : 10 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त 

नाशिक : शहरात ऐनसणासुदीच्या काळात महिलांच्या सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून डल्ला मारणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने चारही संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून 10 गुन्ह्याची उकल झाली आहे. तसेच, दोन दुचाकी आणि 237 ग्रॅम सोने असा 10 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

अनिल भाऊराव पवार (25, रा. सय्यद पिंप्री, लाखलगावरोड), राकेश सुनील पवार (19, रा. म्हसोबा गल्ली, विजय चौक, फुलेनगर, पंचवटी), सोमनाथ हिरामण बर्वे (30, रा. मातोरी, मुंगसरारोड, ता. नाशिक), नितीन उर्फ लाकड्या निवृत्ती पारधी (25, रा. तीन पुतळ्यामागे, फुलेनगर, पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. चारही संशयित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल आहेत. 
गुन्हेशाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीची माहिती मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार येवाजी महाले, शिपाई विशाल देवरे, राहुल पालखेडे, गणेश वडजे, स्वप्निल जुंद्रे यांच्या पथकाने पेठफाटा सिग्नल येथे तर सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब दोंदे, हवालदार अनिल दिघोळे, प्रविण चव्हाण यांनी गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स परिसरात सापळा रचून संशयितांना अटक केली. 
पोलिसांच्या चौकशीमध्ये संशयितांनी शहरासह ग्रामीण भागात सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. गंगापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 3, सरकारवाडा आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून प्रत्येकी 2-2, आडगावच्या हद्दीतून 1, तर ग्रामीणमधील दिंडोरी व ओझर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून प्रत्येकी 1-1 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. संशयितांनी 2017 मध्ये शहरातील पेट्रोल पंपावरही दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, गुन्हेशाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी गुन्हेशाखेच्या युनिट एकने बजावली. 

मोक्काअन्वये कारवाई 
संशयित सोमनाथ बर्वे याच्याविरोधात दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, ऍक्‍ट्रॉसिटी यासारख्या गंभीर स्वरुपाचे 11 गुन्हे दाखल आहेत. तर, नितीन पारधींच्या विरोधात 7, सुनील पवारच्या विरोधात 2 आणि अनिल पवारच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. यामुळे संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या या टोळीविरोधात मोक्काअन्वये कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले. 


संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांनी टोळी तयार करून गुन्हे केले आहेत. त्यामुळे मोक्कान्वये कारवाई केली जाईल. यामुळे गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण होईल. 
- विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com