गर्दीमध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कालिका मंदिरातील घटना : चाणाक्ष महिलेमुळे प्रकार उघडकीस 

नाशिक : नवरात्रोत्सवामुळे नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवी मंदिरात भाविक महिलांची गर्दी असल्याने, त्या गर्दीचा फायदा घेत भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी करताना एकीला महिलांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. तर दुसऱ्या घटनेत हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा करणाऱ्या महिलेलाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने दोघींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

रोशनी संतोष चव्हाण (20, रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद), चिंगू अशोक भोसले (22, रा. औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसर, औरंगाबाद) असे दोघा संशयित महिलांची नावे आहेत. नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच महिला भाविकांची गर्दी असते. आज (ता.1) सकाळी 7 वाजेच्या सुमारास मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोर महिला भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी होती. त्यावेळी पांढऱ्या पंजाबी ड्रेसमधील संशयित एका महिलेच्या पाठीमागे होती. संशयितेने तिच्या हाताच्या बोटांमध्ये असलेल्या ब्लेडच्या सहाय्याने तिच्या पुढे असलेल्या महिला भाविकेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र कापले. मात्र सदरची बाब चाणाक्ष महिलेच्या लक्षात आली. तसे तिने संशयितेचा हात पकडला. परंतु त्याचवेळी मंगळसूत्र कापले गेल्याने ते तुटले असता, ते धरताना संशयिताचा हात सुटला. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत संशयितेने गर्दीतून बाजुला होण्याचा प्रयत्न केला. परंतु भाविक महिलेने ओरडून सांगितल्याने तिथे असलेल्या महिलांनी संशयितेला पकडले. त्यानंतर तात्काळ महिला होमगार्ड व महिला पोलीसांनी संशयितेला ताब्यात घेतले. 
याचदरम्यान, दुसऱ्या संशयितने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केला. मात्र सदरची बाब सुरक्षारक्षकाच्या लक्षात येताच त्याने संशयित महिलेला पकडले आणि मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघी संशयितांना येत्या 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित महिलांकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे. उपनिरीक्षक अंकुश जाधव हे अधिक तपास करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenewschainsnatching