पॉलिसीवर कर्जाचे आमिष; ज्येष्ठ नागरिकाला 24 लाखांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नाशिक : मायको कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पॉलिसी काढण्यास लावून त्यानंतर त्यावर कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठीच्या प्रक्रियेसाठी वारंवार पैसे भरण्यास लावून या ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 24 लाख 35 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. पॉलिसीही नाही आणि कर्ज नाही, अशी फसगत झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दत्तात्रय पंढरीनाथ महाले (65, रा. सप्तशृंगी निवास, जेलरोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या 2014 मध्ये मायको कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांना चांगली रक्कम मिळाली होती. सदरील रकमेची आर्थिक गुंतवणूक त्यांना करायचीच होती. याच दरम्यान, 2015 मध्ये त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला आणि त्याने एमएमसी इन्शुरन्स कंपनी, नवी दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगून रिलायन्स कंपनीच्या पॉलिसीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. आर्थिक गुंतवणुकीवर 15 टक्के व्याज जमा होणार असेही सांगितले. श्री. महाले यांनी पॉलिसी काढण्यास होकार दिला आणि 1 लाख रुपयांचा पहिला वार्षिक हप्ता त्यांनी रेजिमेंटल प्लाझा येथील एचडीएफसी बॅंकेच्या खात्यात जमाही केला. त्यानंतर त्यांना ऑनलाईन पोस्टाने पॉलिसी घरपोच मिळाली. त्यानंतर एकेदिवशी त्यांना राजू अग्रवाल नामक इसमाने फोन करून, आपण घेतलेल्या पॉलिसीवर 20 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. त्यावेळी श्री. महाले यांना दुकानासाठी कर्जाची गरज होती. त्यामुळे त्यांनी होकार देत, कर्जासाठी लागणाऱ्या प्रक्रिया केली आणि त्यासाठी 35 हजार रुपये संशयिताने सांगितलेल्या बॅंक खाते क्रमांकावर जमा केली. त्यानंतर सातत्याने बारा ते पंधरा संशयितांनी त्यांना सातत्याने फोन करून कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानुसार, त्यांनी तब्बल 24 लाख 35 हजार रुपयांची रक्कम जमा केली. मात्र संशयितांकडून कोणतेही कर्जप्रकरण मंजूर झाले नाही. वारंवार संपर्क साधल्यानंतरही संशयितांकडून कोणताही प्रतिसाद मिळाली नाही. उलट आणखी 50 हजार रुपये भरले तर तुम्हाला 53 लाख 13 हजार रुपयांचा डीडी तुमच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे सांगितले गेले. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenewsseniorcitizon