दिवाळी सुट्टीत चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान 

Residential photo
Residential photo

गस्तीवर भर : निमा-आयमा-पोलीस संयुक्त मोहीम 

नाशिक : दिवाळी सणानिमित्ताने काही परगावी तर काही पर्यटनानिमित्ताने शहराबाहेर जातात. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांकडून बंद घरे हेरून घरफोड्या होतात. यापार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवस-रात्रीच्या गस्ती पथकामध्ये वाढ केली जाणार आहे. तसेच, सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्याही बंद राहत असल्याने याठिकाणीही सातपूर व अंबड पोलीस ठाण्यामार्फत दिवस-रात्र विशेष गस्ती पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निमा-आयमा उद्योजक संघटनांच्या बैठका घेऊन संयुक्त गस्त मोहीम सुट्टीच्या काळात राबविली जाणार आहे. 


शाळा-महाविद्यालयांना दिवाळी सणानिमित्ताने सुट्टया आहेत. तर, उद्यापासून सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनाही येत्या मंगळवारपर्यंत (ता.29) दिवाळी सुट्टीमुळे बंद राहणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर बहुतांशी नागरिक हे कुटूंबियांसह परगावी अथवा पर्यटनानिमित्ताने शहराबाहेर जातात. चोरट्यांसाठी हीच सुवर्णसंधी असते. याच काळात चोऱ्या-घरफोड्यांचे प्रमाण वाढते आणि पोलिसांसमोर या चोरट्यांचे मोठे आव्हान आहे. 
या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये निमा-आयमा उद्योजक संघटनेसमवेत बैठक झाली. तसेच, पोलीस ठाणेनिहाय चोख बंदोबस्त आणि दिवस-रात्रीच्या गस्तीपथकांचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, दिवस-रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ केली जाणार आहे. अंबड-सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कामगार वसाहत अधिक असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढते. औद्योगिक वसाहतीमध्येही कंपन्या बंद असताना चोरटे अंधाराचा फायदा घेऊन कंपनीच्या आवारातील साहित्य चोरून नेण्याचे प्रकार वाढतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या गस्ती पथकांमुळे चोरीचे प्रमाण घटले आहे. यंदाही त्याचप्रमाणे नियोजन केले आहे. त्याशिवाय नागरी परिसरात फिरते गस्ती पथकांसह दरोडाविरोधी पथक, गुन्हे शाखांचे फिरते पथकही सज्ज राहणार आहेत. त्यासंदर्भात निमा-आयमा या औद्योगिक संघटनांचीही बैठक घेऊन पोलिसातर्फे सुरक्षिततेसंदर्भातील सूचना उद्योजकांना देण्यात आल्या आहेत. 

नागरिकांना आवाहन 
दरम्यान, परगावी जाताना नागरिकांनीही किमती वस्तू घरात न ठेवता, सुरक्षितस्थळी वा बॅंकेत ठेवावे. खरा पहारेकरी-शेजारी या संकल्पनेनुसार शेजाऱ्यांनाही कल्पना द्यावी. तसेच, नजिकच्या पोलीस ठाण्यास कल्पना दिली तर पोलिसांकडूनही त्या-त्या परिसरात गस्त घातली जाईल असेही आवाहन पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. 
 

उद्योजक संघटना दुचाक्‍या पुरविणार 
अंबड-सातपूर औद्योगिक क्षेत्रात उद्यापासून बुधवारपर्यंत पाच दिवस सुट्टी आहे. त्यामुळे याकाळात चोरीच्या घटना घडू नये यासाठी निमा-आयमा संघटनांकडून पोलिसांना गस्तीसाठी दुचाक्‍या, चारचाकी वाहने पुरविण्यात येणार आहे. वाहने उपलब्ध झाल्याने सातपूर, अंबड आणि मुख्यालयातील संयुक्त पथक दिवसरात्र गस्त घालतील. त्याचप्रमाणे, सिडको-सातपूर वसाहतीमध्येही पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. 

दिवाळी सुट्ट्यांमध्ये जाताना सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या तर चोरट्यांना संधी मिळणार नाही. किमती वस्तू घरात न ठेवता बॅंकेत ठेवा. असे असले तरी, पोलीसांकडून याकाळात दिवस-रात्रीच्या गस्ती पथकांमध्ये वाढ केली आहे. क्‍युआर कोड वाढविण्यात आलेले आहेत. गस्तीपथक तर तासाभराने त्याठिकाणी जाऊन गस्त करण्याचे नियोजन आहे. ज्यामुळे चोरी-घरफोडीच्या घटनांना अटकाव करणे शक्‍य होईल. 
- विजय खरात, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2, नाशिक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com