बजाज फायनान्सच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक 

Residential photo
Residential photo

कर्ज मंजूर केल्याची केली बतावणी : शहरात टोळी सक्रिय 

नाशिक : बजाज फायनान्स कंपनीकडून 7 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष दाखवून अज्ञात संशयितांनी एकाला तब्बल दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पैशांची गरज असलेल्यांना गाठून, त्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत त्यांच्याच कागदपत्रांच्या आधारे कर्जप्रकरण करून गंडा घालणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. यातील बहुतांश प्रकरणात तक्रारदारांच्या तक्रारीच पोलीस नोंदवून घेत नसल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा टोळीशी संशयितांचे लागेबांधे आहेत की, पोलिसांचे दूर्लक्ष. मात्र त्यामुळे संशयिताचे फावते आहे. 

अमजद खान शाबीर खान (रा. मदिना नगर, वडाळागाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या जुलै महिन्यामध्ये अज्ञात संशयिताने बजाज फायनान्सकडून 7 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यासाठी नाममात्र व्याजदर असल्याचे सांगत अज्ञात संशयितांनी त्यांचा विश्‍वास संपादन केला आणि त्यांना कर्ज मंजूर झाल्याचे बजाज फायनान्स कंपनीचे बनावट पत्रही खान यांच्या व्हॉटसऍपवर पाठविले. तसेच कर्ज मंजुरीची बनावट पिॉलसीही त्यांना दिली. त्यामुळे त्यांचाही विश्‍वास बसला. त्यानंतर सदरचे कर्ज घेण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी संशयितांनी वारंवार फोन करून एनएफटीद्वारे पाथर्डी फाटा येथील एसबीआयच्या बॅंक खात्यावर 1 लाख 32 हजार रुपये भरणा करण्यास भाग पाडले. तसेच, त्यानंतर मनीट्रान्सफरद्वारे 18 हजार 800 रुपयेही भरणा करण्यास लावले. मात्र त्यानंतरही लोनची रक्कम खान यांच्या खात्यात जमा न झाल्याने त्यांना आपली 1 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार कोकाटे हे अधिक तपास करीत आहेत. 

गंडविणाऱ्या दलालांची टोळी सक्रिय 
गेल्या महिन्यात रितेश केदार युवकाला 25 हजार रुपयांची गरज असल्याने त्याच्या एका मित्राने त्यास बजाज फायनान्समध्ये कर्जप्रकरण मंजूर करून देणाऱ्या बबलू शेख नामक व्यक्तीचा क्रमांक दिला. रितेश याने संबंधित शेख याच्याशी संपर्क साधला असता, त्याने रितेशकडून त्याच्याकडून कर्जप्रकरण मंजूर करून घेण्यासाठी कागदपत्र घेतले. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या खात्यावर 25 हजार रुपये जमा झाले. परंतु जेव्हा कर्जाचा पहिला हप्ता आला, त्यावेळी मात्र त्याच्या नावावर 76 हजार रुपयांचे कर्ज असल्याचे रितेशला समजले. त्याने संशयित शेख यास संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत रितेशने माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. याबाबत रितेश याने पोलिसात तक्रार करण्यासाठी गेला असता, "आम्हाला विचारून कर्ज घेतले का,' असा उलट जाब विचारीत भद्रकाली आणि गंगापूर पोलिसांनी टोलवाटोलवी करीत गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे फसवणूक झालेला युवक आजही पोलिसांकडे तक्रार दाखल करून घेण्यासाठी हेलपाटे मारतो आहे. यावरून शहरात कर्जप्रकरणाच्या नावाखाली गरजवंतांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असून त्याकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जात आहे. यामागे त्यांच्यात लागेबांधे असण्याचीही शक्‍यता व्यक्त होते आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com