आजपासून तीन दिवस भाविकांना पाहता येणार मध्यरात्रीपर्यंत देखावे 

Residential photo
Residential photo

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना रात्री उशिरापर्यंत देखावे पाहाता यावेत, यासाठी उद्यापासून (ता.10) तीन दिवस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. एरवी रात्री 10 वाजेनंतर देखाव्यांसह ध्वनीक्षेपकांवरही बंदी असते. मात्र उद्यापासून तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत भाविकांना देखावे पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. मात्र, त्याचवेळी संगीतावर आधारित देखावे पाहताना डीजेच्या ध्वनीवरही मर्यादा राखावी लागणार आहे. ध्वनी मर्यादेचा भंग झाल्यास पोलिसांकडून यशावकाश गुन्हे दाखल होण्याचीही शक्‍यता आहे. 

वर्षभरातील काही दिवस सार्वजनिक उत्सवाच्या काळात मध्यरात्रीपर्यंतची मर्यादा शिथिल करण्यात येते. त्यानुसार गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस शिथिलता देण्यात आली आहे. यात अखेरच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचाही समावेश आहे. त्यामुळे शहर-जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे मध्यरात्रीपर्यंत पाहाण्याची संधी गणेश भक्तांना मिळणार आहे. त्याचवेळी उपहारगृहांना मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मूभा मिळालेली आहे. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत तीन दिवस दणदणाट असणार आहे. विशेषत: संगीतावर आधारित लाईटिंगचा झगमगाट पाहण्यासाठी तरुणाई उत्साही असते. अन्यवेळी रात्री दहा वाजेपर्यंतची मर्यादा असल्याने बहुतांश नागरिक घराबाहेर पडणे टाळतात. परंतु हीच मर्यादा मध्यरात्रीपर्यंत केल्याने देखावे पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. तर शेवटच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. त्याऐवजी पारंपारिक वाद्य वाजविण्यावर मंडळांनी भर दिला आहे. मात्र रात्री बाराच्या ठोक्‍याला सारेच बंद करावे लागणार आहे. 
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये 39 मौल्यवान गणेश यासह 701 मंडळांचा सहभाग आहे तर, जिल्ह्यातही 25 मौल्यवान गणेशांची स्थापना करण्यात आलेली आहे. यासाठी पोलीस ठाणेनिहाय कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसेच, साध्या वेशातील महिला-पुरुष पोलीसांचीही गस्त शहरात आहे. कोणताही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांची सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. 

ध्वनी मर्यादेकडे नजर 
सार्वजनिक गणेश मंडळांकडून भाविकांना आकर्षित करण्यासाठी देखावे उभारले जातात. काही प्रबोधनात्मक तर काही डीजेचे संगीत अन्‌ लाईटिंगचा मिलाप असतो. अशाच देखाव्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. रात्रीच्या वेळी शांतता क्षेत्रात 40 तर निवासी क्षेत्रात 45 डेसीबल ध्वनीमर्यादेची क्षमता आहे. या ध्वनीमर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्या मंडळांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. सदरचे डेसीबलची मोजमाप करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून पोलिस ठाण्यांना यंत्र देण्यात आलेले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com