महाजनादेश यात्रेतील बाइक रॅलीने सिडको भगवेमय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत 

चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत 

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही पाथर्डी फाटा ते दत्तमंदिर चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून असलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे गुलाबपुष्पांच्या वर्षावात स्वागत केले. चौकाचौकांत भाजप नेत्यांकडून यात्रेचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. 
महाजनादेश यात्रेला बुधवारी (ता. 18) सायंकाळी पाचच्या सुमारास पाथर्डी फाटा येथून प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे हे महाजनादेश यात्रेच्या रथावर होते. पाथर्डी फाटा येथून निघालेली अंबड- लिंक रोडने उत्तमनगर चौकाकडे मार्गस्थ झाली. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या नागरिकांकडून महाजनादेश यात्रेचे स्वागत केले जात होते. चौकांमध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. उत्तमनगर चौकात आमदार सीमा हिरे यांच्याकडून स्वागत करण्यात येऊन गुलाबपुष्पांचा वर्षाव करण्यात आला. तसेच, ढोलताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी स्वागत केले. रॅलीच्या प्रारंभी शेकडो बाईकस्वार तरूण होते तर मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर बाईकस्वार महिला होत्या. पारंपरिक वेशभूषा आणि फेटा परिधान केलेल्या महिला लक्ष वेधून घेत होत्या. सदरची बाईक रॅली उत्तमनगर, पवननगर, सावतानगर, दिव्य ऍडलॅब, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉल, मायको सर्कल मार्गे गोल्फ क्‍लब मैदान येथे संपली. 

कडेकोट पोलिस बंदोबस्त 
पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय खरात, पौर्णिमा चौघुले यांनी पाथर्डी फाटा येथे दाखल होत बंदोबस्ताची पाहणी केली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा खडा पहारा होता. चौकाचौकात बॅरिकेटींग करून वाहतूक अडविण्यात आली होती. इमारतींवरून पोलिसांकडून टेहाळणी केली जात होती. वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी हे रॅलीच्या अग्रभागी राहत रॅलीला वाहतुकीचा अडथळा येणार नाही, याची दक्षता घेत होते. 

* अंबड-लिंक रोडच्या दुतर्फा इमारतीवर नागरिकांची गर्दी 
* रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुभाजकांवर थांबून रॅलीचे स्वागत 
* पोलीसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त 
* इमारतींवरून पोलीसांची रॅलीवर टेहाळणी 
* चौकाचौकात रांगोळ्या काढल्या 
* चौकाचौकात ढोलताशा, लेझीम पथकाकडून रॅलीचे स्वागत 
* पवननगर येथे नगरसेवक मुकेश शहाणे, दिव्य ऍडलॅब चौकात नगरसेवक दिनकर पाटील यांच्याकडून हॅड्रोलिक ट्रॉलीतून मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचे पुष्पहार घालून स्वागत. महाजनादेश यात्रेवर पुष्पवर्षाव 
* रॅलीत पारंपरिक वेशभूषा व फेटा परिधान केलेल्या महिला ठरल्या आकर्षण 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikmahajanadeshrallynews