घराच्या ओढीने गेले; पण परत वृद्धाश्रमात आले...  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

घराच्या ओढीने गेले; पण परत वृद्धाश्रमात आले... 

नाशिक : म्हतारपण खूप वाईट असते, असे जे म्हटले जाते ते खरेच आहे. ज्या कुटूंबासाठी आयुष्यभर कष्ट केले, त्याच कुटूंबियांनी त्यांना उतारवयात वृद्धाश्रमात आणून सोडले. वृद्धाश्रमात साऱ्या सुखसोयी असतानाही, कुटूंबियांमध्येच राहण्याच्या ओढीने 85 वर्षीय बाबांनी वृद्धाश्रम सोडले. आपल्या घराच्या दिशेनेही निघाले, परंतु त्याच कुटूंबियांनी त्यांना परत पोलिसांमार्फत वृद्धाश्रमात आणून सोडले. नियतीचा हा अजब खेळ पाहून बाबांच्या त्या निरागस डोळे बरेच काही सांगू पाहात होते... 

मुंबईत गिरणी कामगार असलेले 85 वर्षीय मनोहर बागुल (नाव बदलले आहे). मुंबईच्या अंधेरी परिसरात त्यांचे स्वकष्टाने उभे केलेले स्वत:चे घरही आहे. परंतु घरगुती वादातून त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना काही वर्षांपासून नाशिकमधील टाकळी रोडवरील "वात्सल्य' या वृद्धाश्रमात आणून सोडले आहे. वृद्धाश्रमात त्यांना साऱ्या सुखसोयी आहेत. याठिकाणी त्यांना कसलीही कमतरता नाही. परंतु तरीही त्यांना नेहमीच घराची ओढ लागून राहायची. मुलं-मुली, नातवंडांची आठवण त्यांना यायची आणि त्यांचे मनही भरून यायचे. त्यातच त्यांना काही प्रमारात विस्मरणाचाही त्रास जडलेला. 
चार दिवसांपूर्वीची घटना. मनोहर बाबा कोणालाही काही न सांगता वात्सल्य वृद्धाश्रमातून मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर पडले. नाशिकरोड रेल्वेस्थानक गाठले आणि अंधेरीला जाण्यासाठी म्हणून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत बसलेही. इकडे वात्सल्यात मनोहर बाबा नाहीसे झाल्याने एकच खळबळ उडाली. शोधाशोध सुरू केली. मात्र ते कुठेही सापडले नाही. म्हणून, वात्सल्याचे संचालक सतिश सोनार यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून रितसर मनोहर बाबा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पर्यायी त्यांनी शोधमोहीम सुरूच ठेवली होती. 

बाबा पोहोचले अंधेरीत पण... 
मनोहर बाबा अंधेरीपर्यंत पोहोचले खरे, परंतु त्यांना त्यांचे घर सापडेना. म्हणून त्यांनी अनेकांना त्यांच्या घराचा पत्ता विचारला. परंतु त्यांना काही सापडेना. अखेर काही मंडळींनी त्यांना पोलीस ठाण्यात पोहोचते केले. अंधेरी पोलिसांनी मनोहर बाबांकडून त्यांच्या मुलाचा मोबाईल क्रमांक घेतला आणि त्यांना फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मुलानेही मनोहर बाबांना घरी घेऊन जाण्याऐवजी, नाशिकच्या वात्सल्य वृद्धाश्रमात संपर्क साधून बाबांना घेऊन जाण्यासाठी बोलावून घेतले. त्यानुसार वृद्धाश्रमाचे अधिकारी पोहोचले आणि पोलिसांनी मनोहर बाबांना त्यांच्या सुपूर्द केले. मात्र ज्या ओढीने मनोहर बाबा वृद्धाश्रमातून निघाले होते, ती वाट अर्ध्यावरच सोडून परत वृद्धाश्रमात यावे लागले. पण त्यांच्या निरागस डोळे बरेच काही सांगू पाहत होते... 

मनोहर बाबांना शहर आणि परिसरात खूप शोधले. त्यांना विस्मरणाचा त्रास असल्याने आम्ही जास्त धास्तावलो होतो. सुदैवाने ते सुखरुप असल्याचे कळताच जीवात जीव आला. अतिशय प्रेमळ असलेल्या मनोहर बाबांनी अनेकांना लळा लावला आहे. 
- सतिश सोनार, संचालक, वात्सल्य वृद्धाश्रम, टाकळी रोड, नाशिक.