कॉलेजरोडवर दोघा टवाळखोरांना घडली अद्दल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

निर्भयाची कारवाई : विद्यार्थिनींनी फोटो काढून पाठविले 

निर्भयाची कारवाई : विद्यार्थिनींनी फोटो काढून पाठविले 

नाशिक : कॉलेजरोडवर नेहमीच टवाळखोरांकडून विद्यार्थिंनीची छेडखाणी केली जाते. मात्र आज काही विद्यार्थिनींनी अशाच दोघा टवाळखोरांचा मोबाईलमध्ये फोटो काढून निर्भया पथकाला "सेंड' करताच, अवघ्या काही मिनिटात पथक दाखल झाले आणि त्या दोघा टवाळखोरांच्या मुसक्‍या आवळत गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून निर्भया पथकाकडून शाळा-महाविद्यालयांमध्ये केल्या जात असल्या जनजागृती मोहिमेमुळेच आजची कारवाई झाली. निर्भया पथकाच्या कामगिरीचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कौतूक केले. 

कॉलेजरोडवरील एचपीटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दोघा टवाळखोरांकडून येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थिनींना "टॉंग' मारत छेडखाणी केली जात होती. आज (ता.11) दुपारी दीड वाजेच्या सुमारास काही विद्यार्थिंनींनी त्या दोघा संशयित टवाळखोरांचे त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढला आणि तो नाशिक पोलीसांच्या निर्भया पथकाला "सेंड' केला. 
निर्भया पथकाच्या महिला उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी व त्यांचे पथक त्यावेळी केटीएचएम महाविद्यालयात प्रबोधनात्मक व्याख्यान देत होते. विद्यार्थिंनींनी पाठविलेला फोटो मिळताच पथकाने तात्काळ कॉलेजरोड गाठले. अवघ्या दहाव्या मिनिटाला पथक एचपीटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले आणि फोटोतील दोघांच्या जागेवरच मुसक्‍या आवळत कारवाई केली. टवाळखोरीच्या कलमाअन्वये नोंद करीत, त्यांना न्यायालयासमोर हजरही केले. निर्भया पोलीस पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी, पोलीस नाईक अनिता पाटील, सुरेश घुगे, रविंद्र पवार यांनी ही कारवाई केली. 

टवाळखोरांना बसणार वचक 
एचपीटी महाविद्यालयात सतत विद्यार्थिंनींनी ये-जा सुरू असते. तर काही टवाळखोर नेहमीच रिक्षाथांब्याजवळ थांबतात आणि येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थीनींना टॉंग मारतात. समोरून चालत थेट अंगावर जाण्याचा प्रयत्न करतात, शिट्ट्या वाजवितात, दुचाकीवरील युवतीला थांब तुझ्या गाडीवर बसू दे म्हणतात, अश्‍लिल हावभाव असे प्रकार करीत छेडखानी सुरू असते. मात्र निर्भया पथकाने केलेल्या आजच्या कारवाईमुळे टवाळखोरांवर वचक बसण्यास मदतच होणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikNIRBHAYAcrimenews