शहरभर कडेकोट पोलीस बंदोबस्त; छावणीचे स्वरुप 

Residential photo
Residential photo

आज महाजनादेश यात्रा : पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षेचा आढावा 

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या (ता.18) महाजनादेश यात्रा तर, गुरूवारी (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकमध्ये होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहराला कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्‍मी शुक्‍ला यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत, प्रत्यक्ष पाहणी केली. परजिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 2 हजार पोलीस कर्मचारी परराज्यातून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. 

पोलीस महासंचालकांनी केली पाहणी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा गुरुवारी (ता.19) तपोवनातील साधुग्राम मैदानावर होते आहे. या जाहीर सभेच्या सुरक्षात्मक नियोजनाची जबाबदारी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या (ता.18) महाजनादेश यात्रा शहरातून निघणार आहे. या यात्रेच्या पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्यावर आहे. याचसंदर्भात पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, सुरक्षात्मक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्‍मी शुक्‍ला यांनी आज नाशिकमध्ये दाखल होत, सुरक्षात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर तपोवनातील प्रत्यक्ष सभास्थळाची पाहणी केली. तसेच, पंतप्रधान विमानाने ओझर येथे उतरल्यानंतर हेलिकॉप्टरने हिरावाडीतील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात येतील. त्याठिकाणीही पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी पाहणी करीत सूचना केल्या. यावेळी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, गुन्हेशाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौघुले उपस्थित होते. त्यानंतर, महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये बंदोबस्ताचा आढावा घेतला. 

परजिल्ह्यातून पोलीस दाखल
महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधानांची जाहीर सभा यासाठी राज्यभरातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाचे 2 हजार 500 पोलीस कर्मचारी तर परराज्यातून 1 हजार 800 पोलीस कर्मचारी असा सुमारे 5 हजार पोलीस शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी दोन दिवस शहराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त होणार आहे. 
* पंतप्रधान जाहीर सभेचा बंदोबस्त : 
पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली : पोलीस उपायुक्त -4, सहाय्यक पोलीस आयुक्त - 20, पोलीस कर्मचारी 1780, एसआरपी कंपनी - 4, बॉम्बशोधक-नाशक पथक - 12 यासह क्‍युआरटी, आरसीपीच्या तुकड्या. 
* महाजनादेश यात्रा बंदोबस्त : 
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या नेतृत्वाखाली : पोलीस उपायुक्त -4, सहाय्यक पोलीस आयुक्त - 10, पोलीस निरीक्षक -22, पोलीस कर्मचारी - 600, एसआरपीएफ कंपनी - 2, क्‍युआरटी-आरसीपी कंपनी - 4. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com