शिखरेवाडीत टवाळखोरांकडून तोडफोड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

घरात घुसून मारहाण; महिलांची केली छेडखानी 

नाशिक : उपनगर परिसरात असलेल्या शिखरेवाडीतील मैदानावर टवाळखोरी करणाऱ्यांनी जवळ असलेल्या एका सर्वसामान्य नागरिकाच्या घरावर हल्ला करीत तोडफोड केली. तसेच, घरात घुसून महिलांचीही छेडखानी केल्याचा प्रकार घडला. सदरच्या घटनेमुळे संबंधित कुटूंबिय दहशतीखाली असून, मैदानात रात्रभर धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

उपनगरमधील शिखरेवाडी मैदान आहे. या मैदानावर रात्रभर काही ठराविक टवाळखोरांकडून धिंगाणा घातला जातो. दारू पिऊन दंगामस्ती केली जाते. याच टवाळखोरांकडून परिसरातील नागरिकांना त्रास दिला जातो. त्यामुळे त्यांची परिसरात दहशत पसरविली आहे. याबाबत अनेकदा पोलिसांना माहिती दिली गेली. परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. परंतु, बुधवारी (ता.2) रात्री याच टवाळखोरांनी परिसरातील इमारतीतील एका इसमाच्या घरावर जाणीवपूर्वक हल्ला केला. दगडफेक करून घराच्या खिडक्‍यांच्या काचा फोडल्या. तसेच, बंद दाराला लाथा मारून तो तोडला. त्यानंतर टवाळखोरांनी घरात घुसून घरातील महिलांची छेडखानी केल्याचा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती उपनगर पोलिसांना कळविल्यानंतरही पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत. अखेरित पीडित इसमच उपनगर पोलिसात तक्रार देण्यासाठी दाखल झाले. मात्र उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. 

टवाळखोर वरचढ 
उपनगर परिसरातील गुन्हेगारी फोफावलेली आहे. टवाळखोरांवर कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिक धास्तावलेले आहेत. पोलिस आणि टवाळखोरांमध्ये लागेबांधे असल्यानेच शिखरेवाडीत टवाळखोरी करणाऱ्यांवर अद्यापपर्यंत कारवाई होत नसल्याचे बोलले जाते. तरी पोलीस आयुक्तांनी सदरील घटनेची गांभीर्याने दखल घेत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikroad-todfod-crimenews