एसबीआयचे एटीएम फोडून 32 लाखांची रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नाशिक : मखमलाबाद गावातील बसस्थानकासमोरील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम बुधवारी (ता. 21) पहाटे गॅस कटरने कापून चोरट्यांनी 31 लाख 75 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. 

नाशिक : मखमलाबाद गावातील बसस्थानकासमोरील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम बुधवारी (ता. 21) पहाटे गॅस कटरने कापून चोरट्यांनी 31 लाख 75 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. 
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी संगणकीय प्रणालीद्वारे मखमलाबाद गावातील एटीएमचा वापर न झाल्याचे निदर्शनास आले. त्याची पाहणी करण्यासाठी गुरुवारी (ता. 22) अधिकारी गेले असता, एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून 31 लाख 75 हजार नऊशे रुपयांची चोरी झाल्याचे समजले. घटनास्थळी पोलिस उपायुक्त (गुन्हे) लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ एकचे अमोल तांबे, परिमंडळ दोनचे विजय खरात, सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील, परिमंडळ एकचे मोहन आढाव, म्हसरूळचे वरिष्ठ निरीक्षक संजय सांगळे, पंचवटीचे निरीक्षक के. डी. पाटील, गुन्हे शाखा युनिट एकचे आनंदा वाघ, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील रोहकले, गुन्हे शाखा युनिट दोनचे दिनेश बर्डेकर यांनी धाव घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे व श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी एटीएमच्या बाजूस असलेल्या कृषिसेवा केंद्रात व प्रांगणात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून बघितले असता, ही घटना बुधवार (ता. 21) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. इनोव्हा कारमधून आलेल्या चोरट्यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 
जेल रोड व मखमलाबादचे एटीएम एकाच वेळी फोडल्याचे आढळल्याने ही टोळी नाशिकमध्ये सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर 
मखमलाबाद गावात स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. परंतु या ठिकाणी सुरक्षारक्षक नाही. सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा, अलार्म अलर्ट नाही आणि सर्व स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सुरक्षेचा ठेका हा एस. के. इलेक्‍ट्रिक या कंपनीकडे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnewsATMcashthief