"भयमुक्त-गुन्हेगार मुक्त नाशिक' हेच आपले "ड्रीम' 

Residential photo
Residential photo

नाशिक : शहरातील लहान मुले, वयोवृद्ध, महिला, पीडितांच्या सुरक्षितता महत्त्वाची आहे. कम्युनिटी-सोशल पोलिसिंग करताना, बेसिक पोलिसिंकही दूर्लक्षित होता कामा नये. त्यासाठी व्हिज्युअल पोलिसिंगवर भर दिला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत. मूळातच, नाशिकसारखे सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रभावी, तसेच वाईन हब म्हणून उदयास येणारे हे शहर "भयमुक्त आणि गुन्हेगारमुक्त' असले पाहिजे आणि हेच माझे "ड्रीम' आहे. त्यासाठी म्हणून करावयाचे नियोजन आणि अंमलबजावणीला आपले प्राधान्य असेल, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. दरम्यान, यावेळी "सकाळ-तनिष्का' भगिनींनी पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांना रक्षाबंधननिमित्ताने ओवाळले असता, त्यासाठीची ओवाळणी त्यांनी पुरग्रस्तांसाठीच्या "सकाळ' रिलिफ फंड'मध्ये जमा केली. 

"कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात सहभागी होत, पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी, आपल्या पोलीस सेवेतील 22 वर्षांच्या कारकिर्दीविषयी उपस्थितांशी मनमुक्त संवाद साधला. प्रारंभी "सकाळ'चे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी श्री. नांगरे-पाटील यांचे स्वागत केले. यावेळी संवाद साधताना पोलीस आयुक्त श्री. नांगरे-पाटील म्हणाले, गुन्हेगारी मुक्त शहर हीच पोलीसांची प्राथमिकता आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून ज्या काही उपाययोजना, नियोजनांची अंमलबजावणी होते आहे. लहान मुले, युवती, महिलांसाठी आपले शहर सुरक्षित असायला हवे. त्यासाठी शहरात शिस्तही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विश्‍वसनीय हवी. त्यासाठी रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, येत्या काही महिन्यात शहरात 900 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभे राहणार आहे. सोनसाखळी चोरट्यांवर वचक बसविणे शक्‍य होईल. सार्वजनिक वाहतुकीचे तज्ज्ञ असलेले प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेची बससेवा आकाराला येते आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी तडीपारी, एमपीआयडीच्या कारवाया वाढविण्यात आल्या आहेत. दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्यांना तडीपार केले. त्याचा गुन्हेगारीवर वचक निर्माण झाल्याचेही श्री. नांगरे-पाटील म्हणाले. 
 
पीडित महिलांसाठी पोलीस ठाणे माहेरघरच 
पोलीस म्हणून कर्तव्य बजावित असताना, पीडितांना न्याय देणे आणि समाजात गैरवर्तनाला थारा न देणे हेच प्रथम कर्तव्य आहे. ते जर होत नसेल तर पोलीस म्हणून खाकी परिधान करण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे पीडित महिलेने पोलीस ठाण्यात येताना, हे आपले हक्काचे माहेर आहे. याठिकाणी असलेला प्रत्येक खाकीतील पोलीस भाऊ आहे आणि त्याच्याकडून न्याय मिळालाच पाहिजे, अशी भावना असायला हवी. महिला, युवतींच्याच सुरक्षिततेसाठी निर्भया पथक कार्यान्वित आहे. साध्या वेशातील महिला पोलीसच "डी-कॉय' होऊन टवाळखोरांच्या मुसक्‍या आवळताहेत. 

 
नाशिकचे तरुण सकारात्मक 
विदर्भवगळता महाराष्ट्रभर पोलीस सेवा करीत असताना, नाशिकच्या तरुणाईमध्ये अजब ऊर्जा आहे. सदृढ वातावरणामुळे तरुण कष्टाळू आहेत. शैक्षणिकदृष्टया आणि आध्यात्मिक भूमी असल्यामुळे येथील तरुणाईमुळे अजब अशी ऊर्जा आहे. तितकेच ही तरुणाई सकारात्मकही आहे. हीच ऊर्जा आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी, चुकीच्या वाटेने जाऊ पाहणाऱ्यांवर पोलिसांकडून समुपदेशन करून त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा विशेष प्रयत्न नाशिक पोलीस करीत आहेत. 

व्हिज्युअल पोलिसिंग अन्‌ प्रतिबंधात्मक कारवाई 
रस्त्यावर, चौकात पोलीस दिसला तरीही गुन्हा घडणार नाही याचीच शक्‍यता अधिक असते. त्यासाठी व्हिज्युअल पोलिसिंग करताना, प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय क्‍युआर-कोडींग सिस्टिम वाढविली. त्यासाठी पोलीस ठाण्यांना वाहने, इंधनखर्च वाढविला. त्यामुळे दर दोन तासांनी प्रत्येक कोडचे स्कॅनिंग वाढले. परिणामी व्हिज्युअल पोलिसिंग प्रणाली यशस्वी होते आहे. तसेच झोपडपट्ट्यांमध्ये सातत्याने कोमिंबग करीत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. यातून गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत होते आहे. 
 
ट्रॅफिकमधून दंडाचा रुपयाही नको 
सीटबेल्ट, हेल्मेट सक्तीतून 1 रुपयांही वसुलीची अपेक्षा नाही. परंतु शिस्त-वाहतुकीचे नियम पाळणेही आवश्‍यक आहे. त्यामुळेच गतवर्षाच्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये 17 अपघातांचे बळीत घट झाली आहे. अपघातात बळी जाण्याचे आख्खे कुटूंब उघड्यावर येते. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर ब्रेथऍनालायझरद्वारे कारवाई केल्याने, आता मद्यपीवाहनचालक शोधून सापडत नाही. आर्थिक-मालमत्ता फसवणुकीचे गुन्हे मात्र वाढले आहेत. त्यावर अंकुश आणण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू आहेत. 
 
तनिष्का भगिनींची ओवाळणी पुरग्रस्तांना 
"सकाळ' कार्यालयात "तनिष्का' भगिनींनी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना रक्षाबंधन निमित्ताने औक्षण करीत ओवाळले. यावेळी उपस्थित असलेल्या तनिष्का भगिनींनी पोलीस आयुक्तांना भाऊ-बहिणींचे प्रतिक असलेली राखी बांधली. तर, पोलीस आयुक्तांनीही भगिनींसाठीची ओवाळणीची रक्कम सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठीच्या "सकाळ रिलिफ फंड'मध्ये जमा केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com