समाजोपयोगी उपक्रमात गणेश मंडळांच्या योगदानाची गरज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नाशिक : गणेश मंडळांकडून मोठमोठ्‌या मूर्ती आणि देखावे साकारले जातात. ज्यातून सामाजिक संदेशही दिला जातो. त्याचवेळी गणेश मंडळांनी रचनात्मक दृष्टिकोनातून समाजोपयोगी उपक्रम देण्यासाठी योगदाना देण्याची गरज असल्याचे सांगत, पर्यावरणपूरक आणि डीजे-डॉल्बीमूक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. 

नाशिक : गणेश मंडळांकडून मोठमोठ्‌या मूर्ती आणि देखावे साकारले जातात. ज्यातून सामाजिक संदेशही दिला जातो. त्याचवेळी गणेश मंडळांनी रचनात्मक दृष्टिकोनातून समाजोपयोगी उपक्रम देण्यासाठी योगदाना देण्याची गरज असल्याचे सांगत, पर्यावरणपूरक आणि डीजे-डॉल्बीमूक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. 

सरकारवाडा पोलीस ठाण्यातर्फे आयोजित आगामी सणउत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस मुख्यालयातील सभागृहात शांतता व मोहल्ला सदस्य समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी, स्मार्टसिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, नाशिकचा राजा गणेश मंडळाचे समीर शेटे उपस्थित होते. 
बैठकीमध्ये गणेशोत्सव काळात रविवार कारंजा व परिसरात रस्त्यालगत व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडी होते, दहिपुलासह रविवार कारंजा, अशोकस्तंभ या परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे त्रास होतो, गणेशोत्सवात गर्दीमध्ये चोरट्यांकडून महिलांच्या पर्स, दागिने चोरतात, गणेश मंडळांच्या ठिकाणी अवैधरित्या जुगारअड्डे चालविले जातात अशा तक्रारी केल्या. तर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गात स्मार्टरोडचा अडथळा असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित प्रकाश थविल यांनी येत्या 31 तारखपर्यत स्मार्ट रोड दुतर्फा सुरू केला जाईल. तसेच, विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही दिली. वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी यांनी, वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस व महापालिका प्रशासन संयुक्तपणे कामगिरी बजावतील असे सांगितले. तर पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी, आगामी गणेशोत्सवासह सणउत्सव सामाजिक सलोखा अबाधित राखून साजरा करण्याचे आवाहन केले. 
पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, 370 कलमावरून देशभरात तणावाची स्थिती असल्याने सतर्कता बाळगली जाते आहे. त्यासाठी सुसंवाद महत्त्वाचा असून गणेश मंडळंनी पर्यावरणपूरक आणि ध्वनीप्रदूषणमूक्त गणेशोत्सव साजरा करावा. विसर्जन मिरवणूक मध्यरात्री 12 वाजेपर्यत संपवावी. अतिक्रमणाविरोधात पोलीस प्रशासनही कारवाई करील. वर्गणीसाठी दबाव आणल्यास गुन्हे दाखल केले जातील. संशयास्पदरित्या काही निदर्शनास आल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले. यावेळी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके, स्वाती भामरे, वैशाली भोसले, हेमंत जगताप, सत्यम खंडागळे, प्रसन्न तांबड, प्रा. दर्शन पाटील आदींसह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnewspoliceshantatasamiti