बाजार समितीचे सभापती चुंभळे यांना लाच घेताना अटक 

live photo
live photo

नाशिक  : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना कंत्राटी कर्मचाऱ्याकडून 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (ता.16) दुपारी एकच्या सुमारास सदरची कारवाई केली. सभापती चुंभळे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्याला नियमित करण्यासाठी 10 लाखांची लाच मागितली असता, 6 लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 3 लाख ररुपयांची लाच स्वीकारताना सदरची कारवाई झाली. शरणपूर रोडवरील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय परिसरात चुंभळे समर्थकांनी तोबा गर्दी केली होती. दरम्यान, बाजार समिती सभापतींना ई-नाम योजनेचा कंत्राटी कर्मचारी जड पडल्याची चर्चा मात्र भलतीच रंगली. 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम योजनेतील कामावरून कमी करण्यात आलेला कंत्राटी कामगाराने यासंदर्भात तक्रार दिली होती. ई-योजनेअंतर्गत 10 कंत्राटी कामगार नेमले होते. यातील काही कामगारांना कामावरून कमी करण्यात आले असता, तक्रारदाराने परत कामावर घेण्यासाठी सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडे प्रयत्न केले होते. त्यानुसार गेल्या मंगळवारी (ता.13) सभापती चुंभळे यांनी परत कामावर रुजू करून घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 6 लाख रुपये देण्याचे ठरले होते. 
तक्रारदार कामगाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यासंदर्भात शहानिशा झाल्यानंतर आज (ता.16) बाजार समितीच्या आवारात सापळा रचण्यात आला. तक्रारदारांकडून 3 लाख रुपयांची लाच सभापती चुंभळे यांनी स्वीकारली आणि त्याचवेळी दबा धरून असलेल्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर सभापती चुंभळे यांची चौकशी करण्यात आली. तर, कार्यालयाच्या आवारात चुंभळे समर्थकांनी तोबा गर्दी केली होती. चुंभळे यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात शासकीय वाहनातून नेले जात असताना, त्यांच्या मागे समर्थकांच्या गाड्याही पोहोचल्या. 

"पांडुरंग'मधील खोल्या सीलबंद 
शिवाजी चुंभळे यांचा लेखानगर (सिडको) परिसरात पांडुरंग नावाचा बंगला आहे. चुंभळे यांच्या अटकेनंतर तात्काळ त्यांच्या पांडुरंग या बंगल्यावर पथकोन छापा टाकून ताबा घेतला. या बंगल्यातील काही खोल्या या पथकाने सीलबंद केल्या आहेत. त्याचप्रमाणे गौळाणे येथील फार्महाऊसवरही छापा टाकण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पथकाकडून याठिकाणी झडती सुरू होती. 
 

ई-नाम योजना 
नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर या बाजार समितींना राष्ट्रीय कृषी बाजार समितीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ई-नाम योजनेचे काम सुरू झाले. या योजनेतील कामकाजासाठी 10 कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले. या कर्मचाऱ्यांना भविष्यात कायमस्वरूपी होण्याची अपेक्षा होती. मात्र यातील 5 कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. पुन्हा कामावर रुजू घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होती. यातील एका कर्मचाऱ्याकडे सभापती चुंभळे यांनी परत कामावर घेण्यासाठी 10 लाखांची मागणी केल होती. 
 

सभापती पद धोक्‍यात? 
जिल्हा परिषद सदस्य, शेतकरी गटातून सोसायटी सदस्य, माजी नगरसेवक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंक संचालक असे विविध पदे शिवाजी चुंभळे यांनी भोगली आहेत. तर, बाजार समिती संचालक ते सभापतीपद असा प्रवास झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उद्या (ता.17) न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे 24 तासांपेक्षा अधिक कोठडीत ते राहिल्यास त्यांचे सभापती पद धोक्‍यात येईल, अशी चर्चा समितीच्या आवारात सुरू आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com