त्र्यंबकेश्‍वरच्या तिसऱ्या फेरीसाठी जय्यत पूर्वतयारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

नाशिक : श्रावणमासात त्र्यंबकेश्‍वर येथे त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. तर, तिसऱ्या श्रावण सोमवारी (ता.19) ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठीही भाविक लाखोंच्या संख्येने येतात. या पार्श्‍वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तर, याचवेळी प्रदक्षिणेदरम्यान भाविकांच्या आरोग्याच्या समस्या उद्‌भवल्यास, त्यासाठीचे नियोजन जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. तसेच, खासगी वाहनांना खंबाळे फाट्यापर्यंतच प्रवेश असणार आहे. तेथून पुढे मात्र भाविकांना बसेसचा वापर करावा लागणार आहे. 
 
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग म्हणून त्र्यंबकेश्‍वराची ख्याती आहे. त्यामुळे श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची गर्दी होते. परंतु त्यातही तिसऱ्या सोमवारी भाविकांची गर्दी लाखोंच्या संख्येने असते. त्याचवेळी भाविक सुमारे 40 मैलांची ब्रह्मगिरी प्रदक्षिणाही घालतात. या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्र्यंबकेश्‍वर शहरात भाविकांच्या वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असते. त्यामुळे यावेळीही खासगी वाहनांना त्र्यंबकेश्‍वर शहरात प्रवेश बंदी केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. खासगी वाहनांना खंबाळेपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे तर, जव्हार फाट्यापर्यंत महामंडळाच्या बसेस जातील. 
 
आरोग्य यंत्रणा सज्ज 
त्याचप्रमाणे, त्र्यंबकेश्‍वर परिसरात सातत्याने पावसाच्या सरी कोसळत असतात. त्यामुळे तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी येणाऱ्या भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागामार्फत प्राथमिक उपचार केंद्र उभारली जाणार आहेत. त्यासाठीचे नियोजन जिल्हा रुग्णालयामार्फत केले जाणार आहे. तसेच, रुग्णास तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात येणार आहे. एकूणच, पोलीस आणि आरोग्य विभागाकडून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या पार्श्‍वभूमीवर येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष नियोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. 
 
पोलीस बंदोबस्त 
एक अपर पोलीस अधीक्षक, 3 पोलीस उपअधीक्षक, 11 पोलीस निरीक्षक, 28 सहाय्यक निरीक्षक, 43 वाहतूक पोलीस, 280 पोलीस कमर्चारी, 80 महिला पोलीस, 700 होमगार्ड, 2 बीडीडीएस पथक, शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे. 

वाहतूक नियोजन 
*नाशिककडून खंबाळेपर्यंत खासगी वाहतूक. 
*जव्हारकडून अंबोलीपर्यंत खासगी वाहतूक. 
*इगतपुरी-घोटीकडून पहिनेपर्यंत खासगी वाहतूक. 
*गिरणारेकडून तळवाडेपर्यंत खासगी वाहतूक. 
*त्र्यंबकेश्‍वरमधील कुंभारतळे येथे वाहन पार्किंग. 

तिसऱ्या श्रावण सोमवारी लाखो भाविक येण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. खासगी वाहनांना त्र्यंबकेश्‍वर शहरात प्रवेशबंदी राहील. त्यामुळे भाविकांनी बसेसचा वापर करावा. 
- डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnewstbk