सालदाराच्या मुलांनी फुलविले नंदनवन ; शेकडो मजुरांना रोजगार

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 15 एप्रिल 2018

आज ते शेतात कांदे, कापूस, डाळिंब, मिरची आदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. त्यातून त्यांना लाखो रुपये उत्पन्नही मिळते. त्यांनी शेतापर्यंत येण्यासाठी स्वखर्चातून रस्ता तयार केला असून त्याचा लाभ आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांनाही होतो.

निजामपूर-जैताणे (धुळे) : घरात अठराविश्वे दारिद्र्य. नापिकीमुळे सालदारकी करून वडिलांनी कुटुंबाचा गाडा ओढला. आई मोलमजुरी करून कुटुंब सावरत होती. वडिलोपार्जित कोरडवाहू शेतजमीन. त्यातही पाण्याचे वणवण. सततची नापिकी व कर्जबाजारीपणा. जगण्याची लढाई लढताना हळूहळू मुले मोठी झाली. मुलांच्या कर्तबगारीमुळे जगण्याची उमेद वाढली. सालदारकी करता करता दोन्ही मुलांसह कोरडवाहू शेतीकडे लक्ष केंद्रित केले. मुलांनी रात्रपहाट एक केली. पाण्याचे स्रोत निर्माण केले. बारा एकर शेतजमीन कसून स्वकष्टाने मुलांनी आज चाळीस एकर जमिनीत नंदनवन फुलविले आहे. ही यशोगाथा आहे खुडाणे (ता.साक्री) येथील प्रगतिशील शेतकरी सीताराम रामा गवळे, गंगाबाई सीताराम गवळे यांच्यासह त्यांची दोन्ही मुले हिलाल गवळे (वय-३९) आणि दादाजी गवळे (वय-३६) यांची.

खुडाणे (ता.साक्री) येथील शेतकरी हिलाल गवळे व दादाजी गवळे यांची गावापासून दोन-अडीच किलोमीटरवर डोमकानी शिवारात सुरुवातीस बारा एकर वडिलोपार्जित पडीक, कोरडवाहू, डोंगराळ शेतजमीन होती. तेथे त्यांच्या वडिलांनी प्रथम एक विहिर खोदली. तिच्यावर सुरवातीला दोन एकर जमीन बागायत केली. नंतर विहिरीचे खोलीकरण करून पूर्ण बारा एकर जमीन मोठया कष्टाने ओलिताखाली आणली. डोंगराळ शेतजमिनीचे जेसीबीद्वारे सपाटीकरण केले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जसजशी उत्पन्नात वाढ होत गेली तसतशी ते आजूबाजूची शेतजमीनही विकत घेत गेले. आज त्यांच्याकडे सुमारे चाळीस एकर शेतजमीन आहे. तेवढया क्षेत्रात एकूण पाच विहिरी खोदल्या असून त्यापैकी तीन विहिरींना मुबलक पाणी आहे. विहिरी खोदण्याच्या आधी त्यांनी १४ ते १५ कूपनलिका अर्थात बोअरवेल केले. परंतु सुमारे आठशे फूटापर्यंत बोअरवेल करूनही पाणी लागले नाही. त्यात त्यांचा लाखो रुपये खर्च वाया गेला. त्यांनतर त्यांनी आपला मोर्चा विहिरींकडे वळविला. 

आज ते शेतात कांदे, कापूस, डाळिंब, मिरची आदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. त्यातून त्यांना लाखो रुपये उत्पन्नही मिळते. त्यांनी शेतापर्यंत येण्यासाठी स्वखर्चातून रस्ता तयार केला असून त्याचा लाभ आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांनाही होतो.

शेतातच गांडूळखत प्रकल्प

गवळे बंधूंनी स्वतःच्या शेतातच गांडूळखत प्रकल्प उभारला असून वर्षातून ४ ते ५ ट्रॉली खत तयार होते. एका डेपोतून दर दोन महिन्यांनी एक ट्रॉली खत मिळते. त्याचा त्यांना कांदे, कापूस, डाळिंब, मिरची आदी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यातून हजारो रुपयांची बचतही होते. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी त्यांनी शेजारच्या घटबारी धरणातून सुमारे तीन ते चार हजार ट्रॉली गाळ शेतात टाकला.

कांदे, डाळिंब व मिरची ही मुख्य पिके..

गवळे बंधू कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतात. यावर्षी त्यांनी अठरा एकर कांदे लागवड केली होती. त्यातून आतापर्यंत ११० ट्रॉली कांदा काढण्यात आला आहे. उर्वरित कांदे काढणी सुरू असून कांदा साठवणुकीसाठी त्यांनी एकूण ६ कांदाचाळी बनवल्या आहेत. त्यापैकी ३ चाळी पक्क्या असून ३ कडब्यापासून बनविलेल्या आहेत. अठरा एकर कांद्यापासून त्यांना जवळपास ३० गाड्या माल व सरासरी एक हजार रुपये क्विंटलच्या भावाने तीस लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. दोन एकर शेतजमिनीत सहाशे डाळिंबाची झाडे असून त्यापासून त्यांना पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. 

एक एकरात त्यांनी मिरचीचा ६३०० हा वाण घेतला असून त्याला एकरी एक लाख रुपये खर्च आला आहे. त्यातून त्यांना किमान तीन ते चार लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर, एक बैलजोडी व दोन म्हशी असा लवाजमा आहे.

शेतीतील मॅनेजमेंट गुरू

सीताराम गवळे, दादाजी गवळे व हिलाल गवळे हे तिघेही बापलेक शेतातील मॅनेजमेंट गुरू व उत्तम व्यवस्थापक आहेत. सालदार व मजुरांसह त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतात राबते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मोठे सुपुत्र हिलाल गवळे हे पूर्णवेळ शेती सांभाळतात, तर लहान सुपूत्र दादाजी गवळे हे शेतीसह बाहेरचा पूर्ण व्यवहार सांभाळतात.

'घटबारी'मुळे फायदा

गेल्या दीड वर्षांपूर्वी परिसरातील घटबारी धरण फुटल्यामुळे मागील वर्षी उत्पन्नात घट झाली होती. पण लोकसहभागातून घटबारी बांधाच्या पुनर्निर्माणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणीपातळी वाढली असून यावर्षी पिके भरघोस आली. लोकसहभागातून घटबारीच्या पुननिर्माणात काम पूर्ण होईपर्यंत आमचे एक ट्रॅक्टर आम्ही उपलब्ध करून दिले होते. शासनाकडून सर्व शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळावा. अशी आग्रही मागणीही त्यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

गटशेतीचा यशस्वी प्रयोग
त्यांनी मित्रपरिवारासह खुडाणे व डोमकानी शिवारात गटशेतीही केली आहे. त्यात दादाजी गवळे यांच्यासह संतोष खैरनार, दिलीप गवळे, रमेश जगताप, माधवराव गवळे, भाऊसाहेब मांडळकर आदींचा समावेश आहे. त्यांनी सर्वांनी मिळून प्रत्येकी एकर ते दोन एकर क्षेत्रात गटशेती केली असून त्यात मिरची पिकाची लागवड केली आहे.

शेतीतून रोजगार निर्मिती

शेतीकामासाठी त्यांच्याकडे तीन सालदार असून त्यांनी दोन सालदारांची परिवारासह शेतातच राहण्याची सोय उपलब्ध करून दिली असून एक गावातून ये-जा करतो. खुडाणे व डोमकानी परिसरातील शेकडो आदिवासी व अन्य मजुरांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

"जर अंगी कष्ट करण्याची जिद्द व धडपड असेल तर आजच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोकरीपेक्षा शेतीकडे वळावे. शेतीतही भरपूर उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांनीही शेतीकडे व्यवसाय म्हणून पहावे."
- दादाजी सीताराम गवळे,
प्रगतशील शेतकरी, खुडाणे ता.साक्री..

"कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी.! या संत सावता माळींच्या उक्तीप्रमाणे शेती हीच आमची अवघी पंढरी आहे. तर 'कांदा, मुळा भाजी' हीच आमची विठाई आहे. फक्त शासनाने शेतकऱ्यांविषयीची ध्येयधोरणे योग्य रीतीने राबविण्याची गरज आहे."

- हिलाल गवळे,
प्रगतशील शेतकरी, खुडाणे ता.साक्री.

Web Title: Saldara Agriculture News Many Peoples Got employment